बाळाची बॅग अलीकडे नोकरी करणार्या महिलांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसते. कामावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाला वा मुलीला बेबी केअर सेंटर किंवा पाळणाघरात सोडणे अथवा शाळेत सोडणे हे मनाला काहीसे त्रासदायक वाटत असेल तरी ते काम करावेच लागते. कामावर जाण्यापूर्वी मुलांना लागणार्या आत्यावश्यक वस्तू त्यांच्या बॅगेत भरून ती तयार करणे हे महत्त्वाचे काम असते. आपल्या बाळाच्या बॅगेत त्याला दिवसभर आवश्यक असतील अशा सार्या गरजेच्या वस्तू ठेवाव्यात. त्यासाठी काही उपाय आणि टिप्स जाणून घेणे आपल्या छोट्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
आहार : अनेक बेबी सेंटरमध्ये बाळाच्या खाण्याची व्यवस्था असते. मात्र, त्याबाबत चुकूनही आनंद व्यक्त करू नये किंवा आपले एक काम वाचले याचे समाधान मानू नये. कारण आपल्या बाळाला कोणत्या प्रकारचा आहार हवा असतो हे केवळ आपल्यालाच माहिती असते. त्याला कोणता आहार आवडतो आणि त्यात कोणती पोषक तत्त्वे असली पाहिजेत. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याची बॅग पॅक करावी.
कपडे : लहान मुले फार कमी वेळात कपडे खराब करतात. म्हणूनच त्यांच्यासाठी कपड्यांचे दोन जास्तीचे जोड बॅगमध्ये जरूर ठेवावेत. तसेच ॠतुमानानुसार आणि सेंटरमधील वातावरणानुसार सोबत कपडे द्यावेत. म्हणजेच सेंटरमध्ये एसी असेल अथवा हिवाळ्याचे दिवस असतील तर त्यानुसार बॅगेमध्ये कपड्यांची व्यवस्था करावी. ॠतू आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेणे खूप गरजेचे असते. खाताना अथवा पिताना लहान मुले हमखास कपडे खराब करतात. सर्वच कपडे प्रत्येक वेळी धुण्याऐवजी आपल्या बाळाच्या बॅगमध्ये बेबी बिब किंवा अॅप्रन ठेवावेत.