सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराला स्वतःला एका विशिष्ट साच्यात अडकवून घ्यायला आवडत नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या धाटणीच्या व्यक्तीरेखांच्या शोधात कलाकार मंडळी नेहमीच असतात. अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्या व्यक्तीही याला अपवाद नसतात. नव्याने या क्षेत्रात येऊन बस्तान बसवलेले कलाकारही हटके भूमिकांच्या शोधात असतात. सध्या असाच शोध आयुष्यमान खुराणा घेत आहे. यंदाच्या वर्षी आयुष्यमानने 'आर्टिकल 152, 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले.
या तिन्ही चित्रपटांनी तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली. या तिन्ही चित्रपटांच्या कथानकांची आणि आयुष्यमानच्या अभिनयाची चांगली प्रशंसाही झाली. परिणामी, आज एक यशस्वी कलाकार म्हणून त्याने ओळख मिळवली आहे; पण तरीही त्याची एक इच्छा आजही अपूर्ण आहे. ती म्हणजे आयुष्यमानला आता निगेटिव्हरोल करायचा आहे. याबाबत आयुष्यमान म्हणतो की, मला एखादी नकारात्मक छटा असणारी भूमिका मिळाल्यास खूप आनंद होईल. विशेषतः, एखाद्या भ्रष्ट व्यक्तीची व्यक्तीरेखा मला साकारायची आहे. पण अंतिमतः हा चित्रपट सकारात्मक संदेश देणारा असला पाहिजे असे स्पष्ट करायलाही आयुष्मान विसरत नाही.