सांस्कृतिक भारत: हरयाणा

हरयाणाची राजधानी चंदीगड असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 44,212 चौरस किमी इतके आहे. हरयाणा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी करण्यात आली. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 2,53,53,081 इतकी आहे. राज्याची साक्षरता 76.64 टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा हिंदी आहे तर पंजाबी ही भाषासुद्धा राज्यात ग्राह्य धरली जाते. राज्यातील सर्वात मोठे शहर फरिदाबाद हे असून राज्यात 21 जिल्हे समाविष्ट आहेत.
 
हरयाणाला वेदकालीन इतिहास आहे. दंतकथेतील भरत वंशावरून देशाचे नाव भारत. महाभारत या वीरकाव्यात हरयाणाचा उल्लेख आहे. कौरव-पांडवांच्या महायुद्धाची युद्धभूमी कुरूक्षेत्र हरयाणातच आहे. भारताच्या इतिहासात मुस्लिमांच्या आगमनापासून दिल्ली भारताची राजधानी उदयास येईपर्यंत हरयाणाची महत्वाची भूमिका होती. हरयाणाची भूमी म्हणजे दिल्लीचाच भाग आहे. 1857 मधल्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापर्यंत प्रत्यक्षात अपरिचित. 1857 चे बंड मोडून काढल्यानंतर ब्रिटीश राजवटीची पुनर्स्थापना आणि झाजर आणि बहादुर्गचा नवाब, बालाबगड्या राजा आणि रेवारीचा राव तुलाराम यांच्या अधिपत्याखालील मुलूख बळकावला. त्यातील काही प्रांत ब्रिटीश राजवटीत विलीन तर काही पतियाळा, नभा व जिंद येथील राजाकडे गेला. हरयाणा हा पंजाबचा प्रांत आहे. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाबची पुनर्रचना झाली व हरयाणाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. राज्याच्या पूर्वेला उत्तरप्रदेश, पश्चिमेला पंजाब, उत्तरेला हिमाचलप्रदेश तर ‍दक्षिणेला राजस्थान आहे. दिल्लीचा काही भाग हरयाणात आहे.
 
हरयाणा हे उत्तर भारतातील राज्य आहे. दिल्लीच्या तिन्ही बाजूने व्यापलेले राज्य. यमुना नदी ही या राज्याच्या पूर्वेला वाहते आणि उत्तरप्रदेशासोबतची या राज्याची तीच सीमा आहे. चंदीगड ही या राज्याची राजधानी असली तरी पंजाबची राजधानीही चंदीगड हीच आहे. डॉ. झाकीर हुसेन गुलाब गार्डन आणि रॉक गार्डनमधील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. निवडक अन्नधान्याचे उत्पादन जे राज्याच्या आरंभीच्या काळात जवळजवळ 25.92 लाख टन उत्पादन. राज्यातील मुख्य पिके तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, बारली, डाळी, ऊस, कापूस, तेलबिया व बटाटे ही आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, फळे आणि भाज्यांसारख्या पिकांनासुद्धा प्राधान्य दिले जाते.
 
आग्रोहा हे प्राचीन ऐतिहासिक अवशेष व शक्‍ती सरोवर यासाठी प्रेक्षणीय शहर आहे. अंबाला हे ठिकाण शहर व छावणी या दोन विभागात विभागलेले आहे. शिखांचे धार्मिक स्थान. करनाल येथे असलेले रम्य व सुंदर चक्रवर्ती सरोवर. कुरूक्षेत्र हे कौरव व पांडवातील महाभारतीय युद्धाचे स्थान. ज्योतिसर या जागी श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली. थानेसर या ऐतिहासिक ठिकाणी राजा हर्षवर्धनाची राजधानी होती. गुडगाव हे औद्योगिक शहर. जिंद हे ऐतिहासिक शहर, प्राचीन महाल. झज्जर हे सुद्धा ऐतिहासिक शहर. नारनौल हे प्राचीन शहर, ऐतिहासिक अवशेष, व्यापारी पेठ. पानिपत ही हरियाणाची दुसरी युद्धभूमी इस 1526 मध्ये बाबर व ईब्राहीमखान लोधी, 1556 मध्ये अकबर व हिमू, 1761 मध्ये अहमदशहा अब्दाली व मराठे या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या लढायांचे स्थान. फरिदाबाद हे औद्योगिक शहर. रोहतक हे प्राचीन ऐतिहासिक शहर. सुलतानपूर पक्षी अभयारण्य. हान्सी येथील ऐतिहासिक अवशेष.
 
राज्यात चार पर्यटक केंद्रांचे जाळे. दरवर्षी 55 लाख पर्यटक राज्यात भेट देतात. ब्ल्यू जय (समालखा), स्कायलार्क (पानिपत), चक्रवर्ती लेक आणि ओअॅसीस (ऊचना), पाराकित (पिपली), किंगफिशर (अंबाला), मॅगपाय (फरिदाबाद), दाबाचिक (होडेल), शामा (गुडगाव), जंगल बब्बलर (धरूहेरा), गौरिया (बहादूरगड), मायना (रोहतक), ब्लू बर्ड (हिस्सार), रेड भिशॉप (पंचकुला) आणि पिंजोर गार्डन्स (पिंजोर) आदी प्रमुख पर्यटक वसाहती आहेत. आंतरराष्ट्रीय किर्तीचा सुरजकुंड हस्तकला मेळा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये भरतो. हरयाणात 21 टुरिझम हब आहेत. हरयाना टुरिझम कॉर्पोरेशनने ही हब स्थापन केली आहेत. अंबाला, भिवानी, फरिदाबाद, फतेहबाद, गुरगाव, हिसार, जझ्झर, जिंद, कैथाल, करनाल, कुरूक्षेत्र, पंचकुला, सिरसा, सोनिपत, पानिपत, रेवरी, रोहतक, यमुनानगर, पलवाल आणि महेंद्रगड आदी ठिकाणी हे हब आहेत.
 
हरयाणात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. बांगरू, जाटू (जाट), हरयानी, खारीबोली, बंजारी (बंजारा), गुज्जरी (गुज्जर) अशा काही बोलीभाषांचा उल्लेख करता येईल. राज्यात अनेक लोकनृत्य प्रचलित आहेत. पैकी सांग, छाटी, खोरिया, रास ‍लिला, धमाल, झुमार, लोर, गुग्गा, तेज, फाग, चौपारिया अशी काही लोकनृत्य महत्वाची आहेत. सारंगी, हार्मोनियम, चिमटा, धाड, ढोलक, मंजिरा, खारताल, डमरू, डुग्गी, डफ, बासरी, बीन, घुंगरू, ढाक, घाऱ्हा, थाली, शंख आदी लोकवाद्य हरयाणात पारंपरिक पद्धतीने वाजवली जातात. हरयानवी हे आपल्या लोकगीतात खूप श्रीमंत भाषा आहे. रागिनी हे लोकगीत खूप लोकप्रिय असून लोकनाट्यात स्वाँग हे लोकनाट्य लोकप्रिय आहे. हरयानवी भाषा ही विनोदाची भाषा आहे, असा समज प्रचलित व्हावा इतका विनोद या भाषेत आहे. सुरेंदर शर्मा हे अशा विनोदासाठी या राज्यात लोकप्रिय आहेत. त्यांच्या विनोदात हरयाणातील ग्रामीण भागाचे चित्र दिसते.
 
लोहरी, बैसाखी, तेज, कुरूक्षेत्र उत्सव, आंबा उत्सव, हरयाणा दिवस, महाभारत उत्सव, सुरजकुंड यात्रा, सोहना कार रॅली, पिंजोर पारंपरिक उत्सव, कार्तिक सांस्कृतिक उत्सव. हरयाणात पिंजोर, करनाल, हिसार, भवानी, नारनौल आदि ठिकाणी विमानतळ आहेत. अरवली आणि शिवालिक हे पर्वत असून धग्गर- हरका, मार्कंडा, यमुना, चौतांग, दांग्री, कौशल्या, तांग्री, इंदोरी, दोहान, कृष्णावती, साहिवी, सरस्वती, सरसुती, सोंब या नद्या राज्यातून वाहतात.
 
- डॉ. सुधीर राजाराम देवरे

वेबदुनिया वर वाचा