पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट : त्यांच्या मनातील नेमकी सल काय?
मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (13:18 IST)
मागच्या एक महिन्यातील नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात आता दुसऱ्या राजकीय नाट्याची सुरुवात झाली आहे. पण या राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाहीत.
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी ग्रामविकास तसंच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अवतीभोवती हे नाट्य घडताना दिसत आहे.
रविवारी (1 डिसेंबर) पंकजांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय. आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...' असं लिहिलं होतं.
या फेसबुक पोस्टमध्ये पंकजांनी 'मावळे' हा शब्द वापरला होता. हा खास शिवसेनेकडून वापरला जाणारा शब्द असल्यानं पंकजा भाजपला सोडणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. पंकजांबद्दल 12 डिसेंबरला काय ते स्पष्ट होईल, असं विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
भाजपनं शक्यता फेटाळली
भाजपनं मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नसल्याचं सांगत अशी शक्यता फेटाळून लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं.
पण तरी पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन काढून टाकलेला भाजपचा उल्लेख आणि त्यांची फेसबुक पोस्ट यांमुळे पंकजा भविष्याबद्दल काय निर्णय घेणार याबद्दलच्या चर्चा सुरूच आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळे पंकजा मुंडेंनी अशी पोस्ट लिहिली आहे का? हा पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
पंकजा मुंडे यांच्या मनातील नेमकी सल काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.
पक्षाकडून सांत्वन नाही
"परळीत पराभूत होऊनसुद्धा पक्षाने सांत्वन न केल्यामुळे पंकजा नाराज आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट याच गोष्टीचा परिणाम आहे," असं दैनिक पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांना वाटतं.
ते सांगतात, "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. हा पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला होता. पराभव झाल्यानंतर पक्षाकडून पंकजा यांचं सांत्वन होणं अपेक्षित होतं. पण अशा स्थितीतही पक्षाने त्यांना आधार दिला नाही, असा त्यांचा समज झाला असण्याची शक्यता आहे."
पराभवानंतर आजतागायत पंकजा मुंडे प्रचंड अस्वस्थ असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सांगतात. "परळीतील पराभवापासूनच पंकजा अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या मनात या पराभवाची खदखद आहे. या अस्वस्थेला तोंड फोडण्यासाठीच त्यांनी हा मार्ग निवडला आहे," असं उन्हाळे यांना वाटतं.
दुर्लक्षित होत असल्याची भावना
"पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांमध्ये समावेश आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर झालेल्या बैठकांमध्ये त्यांना निमंत्रण देण्यात आलं. पण हे निमंत्रण फक्त औपचारिकता म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे याबाबतची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. पक्षामध्ये आपल्याला दुर्लक्षित करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली असण्याची शक्यता आहे," असं धनंजय लांबे यांना वाटतं.
पक्षांतर्गत राजकारणाची किनार
पंकजा यांच्या नाराजी नाट्याला पक्षांतर्गत राजकारणाची एक किनार असल्याचं मत धनंजय लांबे नोंदवतात. "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना निवडणुकीसाठी तिकीट दिलं नाही. मोदी-शहा यांच्याप्रमाणे राजकारण करून अनेक नेत्यांचे पंख छाटण्याचा प्रकार महाराष्ट्रात दिसून आला. त्याचप्रमाणे 80 तासांच्या सरकारमध्ये फडणवीस यांची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक असल्याच्या चर्चांनाही ऊत आला होतं. आपल्याला सरकार स्थापनेची कल्पना न देता हा निर्णय घेण्यात आला. धनंजय कट्टर प्रतिस्पर्धी असताना असं होण्यामागचं कारण काय असेल हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे," असं लांबे सांगतात.
संजीव उन्हाळे यांच्या मते, "पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे यांच्यामुळे नव्हे तर भाजपमधील काही लोकांमुळे झाला. त्यासाठी रसद पुरवण्यात आली, असा आरोप परळीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत पंकजा यांच्याही मनात अनेक शंका-कुशंका आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुंडे यांची फेसबुक पोस्ट समोर आली असल्यामुळे यामागे फडणवीस यांचं पक्षांतर्गत राजकारण हे खरं कारण असू शकतं."
संघटना ढिसाळ होण्याची शक्यता
संजीव उन्हाळे यांच्या मते, संघटनेवर पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे करत आहेत.
ते सांगतात, "पंकजा यांना ओबीसी नेत्या म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यामागे ओबीसी, माळी, धनगर असा वर्ग आहे. सत्ता कायम असताना कार्यकर्ते नेत्यांच्या आजूबाजूला दिसतात. पण पराभूत नेत्यांच्या मागे कार्यकर्ते किती वेळ टिकणार हा प्रश्न होत असतो. त्यामुळे त्यांची संघटना जपण्यासाठी पंकजा यांची धडपड दिसून येत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी अशा प्रकारची सभा किंवा मोठा निर्णय घेण्याचा मार्ग निवडला असण्याची शक्यता आहे."
पक्ष सोडतील असं वाटत नाही
पंकजा नाराज आहेत, असं वाटत असलं तरी त्या पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत, असं लांबे यांना वाटतं. ते सांगतात, "पंकजा यांच्या वडिलांवरही असा प्रसंग ओढवला होता. पण त्यांनी त्यावेळी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अखेरपर्यंत ते पक्षासोबतच होते. त्यामुळे पंकजासुद्धा वडिलांप्रमाणेच पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतील, त्या पक्ष सोडतील असं सध्यातरी वाटत नाही."
संजीव उन्हाळे सांगतात, "पंकजा मुंडे सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. पक्षात राहून आपली वेगळी ओळख जपावी किंवा पक्षातून बाहेर पडायचा मोठा निर्णय घ्यावा, याबाबत त्यांच्या मनातही द्विधा मनस्थिती असल्याचं दिसत आहे. याबाबत पंकजा काय निर्णय घेतील, हे 12 तारखेपर्यंत स्पष्ट होईल."