मुंबईत विक्रमी पाऊस, भिंत कोसळून 15 ठार, सार्वजनिक सुट्टी जाहीर

मंगळवार, 2 जुलै 2019 (10:08 IST)
मुंबई मध्यरात्री पासून पावसाचा जोर कायम आहे. मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात भिंत कोसळल्यानं 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे शाळा-कॉलेज आणि आफिसेसला सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
24 तासांमध्ये आणखी मुसळधार
येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात 24 तासांमध्ये 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
 
भिंत कोसळून 15 ठार
मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातल्या पिंप्रिपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. वस्तीला लागून असलेली ही भिंत कोसळल्यानं त्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत.
 
NDRF ची घटनास्थळी दाखल झाली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्यसरकारनं 5 लाखांची मदत जाहीक केली आहे.
 
सार्वजनिक सुट्टी जाहीर
पावसामुळे नगरिकांची तारांबळ उडू नये म्हणून राज्य सरकारनं आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
 
मुंबईत विक्रमी पाऊस
मुंबईत गेल्या 2 दिवसांमध्ये झालेला पाऊस हा गेल्या दशकातला सर्वाधिक पाऊस आहे, मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे. साधारणतः संपूर्ण जूनमध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा म्हणजेच 550 मिलीमीटर पाऊस फक्त गेल्या 2 दिवसांमध्ये मुंबईत झाला आहे.
 
सकाळी 7 वाजता - लोकल सेवा विस्कळीत
रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे मुंबईतल्या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवरची रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेची सीएसटीएम-ठाणे, तर पश्चिम रेल्वेची बोरीवली-वसई वाहतूक ठप्प झाली आहे. हर्बर मार्गावरील वाशी-सीएसटीएम वाहतूक ठप्प आहे.
 
नवाब मलिकांच्या घरात घुसलं पाणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरात रात्री उशीरा पाणी घुसल्याचे फोटो ट्वीट केले आहेत. हे ट्वीट करताना त्यांनी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेवर टीका देखील केली आहे.
 
मिठी नदीला पूर
मुंबईतल्या मिठी नदीला पूर आल्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातल्या जवळपास 1000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती