व्याभिचाराचा कायदा करणाराच जेव्हा आढळला व्याभिचाराचा दोषी...

शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (16:15 IST)
अडल्ट्री किंवा व्याभिचारासंदर्भात कठोर कायदा बनवण्यासाठी ज्या व्यक्तीनं मदत केली, तीच व्यक्ती व्याभिचाराप्रकरणी दोषी आढळली. मग काय? ज्या शिक्षेची तरतूद त्यांनं केली होती, तीच शिक्षा त्याला भोगावी लागली. इंडोनेशियातल्या आचे प्रांतात ही घटना घडली.
 
मुखलीस बिन मोहम्मद असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव. मुखलीस यांचे विवाहित महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर कायद्यान्वये मुखलीस यांना चाबकाचे 28 फटके मारण्यात आले. मुखलीस बिन मोहम्मद हे आचे उलेमा काउन्सिलशी (MPU) जोडलेले आहेत.
 
इंडोनेशियातील आचे हा प्रांत इस्लाममधील शरिया कायद्याचं कठोर पालन करणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटके मारले जातात.
 
"शरिया देवाचा कायदा आहे. यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा केली जाते, मग तो आचे उलेमा काउन्सिलचा सदस्य असला तरीही," असं आचे बेसर जिल्ह्याचे उपमहौपार हुसैनी वहाब यांनी बीबीसी न्यूज इंडोनेशियाशी बोलताना सांगितलं.
 
सप्टेंबरमध्ये पर्यटकांच्या चौपाटीजवळच्या पार्किंगमध्ये मुखलीस आणि विवाहित महिला एका कारमध्ये पकडले गेले होते. त्यानंतर ते दोषी आढळल्यानं गुरुवारी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी मुखलीस यांना चाबकाचे फटके मारण्यात आले.
 
मुखलीस यांना आता आचे उलेमा काउन्सिलमधून काढून टाकण्यात येईल. मुखलीस हे इस्लामिक धार्मिक नेतेही आहेत. 2005 साली आचेमध्ये शरिया कायदा लागू झाल्यापासून सार्वजनिकरीत्या शिक्षा झालेले ते पहिले धार्मिक नेते आहेत.
 
विशेष म्हणजे, मुखलीस हे ज्या आचे उलेमा काउन्सिलचे (MPU) सदस्य आहेत, त्याच संघटनेनं स्थानिक सरकार आणि विधिमंडळाला शरिया कायद्याचा मसुदा तयार करून दिला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितलं होतं.
 
इस्लामिक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आचेला विशेष अधिकार देण्यात आला होता. समलैंगिकतेविरोधात 2014 साली आचेमध्ये कायदा करण्यात आला. तसंच, विवाहबाह्य लैंगिक संबंध, जुगार, मद्य प्राशन आणि विक्री हेही शरिया कायद्यांन्वये चूक मानलं जातं. 2017 साली दोन पुरुषांना लैंगिक संबंध ठेवल्यावरून प्रत्येकी 83 चाबकाचे फटके देण्यात आले होते.
 
चाबकाचे फटके देणाऱ्या व्यक्तीचं अंग पूर्णपणे झाकलेलं असतं. फक्त डोळ्यांचा भाग उघडा असतो, जेणेकरून ती व्यक्ती कुणालाही ओळखू येऊ नये. शिवाय, हे फटके सार्वजनिक ठिकाणी दिले जातात. लहान मुलांना मात्र हा सर्व प्रकार पाहण्यास मज्जाव केला जातो. मुस्लीम असो वा नसो, आचेमध्ये सर्वांना शरिया कायदा लागू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती