IndvsEng: नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन दिवसांमध्येच टेस्ट मॅच का संपली असावी?
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (18:03 IST)
आदेश कुमार गुप्त
बीबीसी हिंदीसाठी
भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळली गेलेली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसातच संपली. भले भारताने ही मॅच जिंकली पण सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाच की असं जिंकणं टेस्ट क्रिकेटसाठी योग्य होतं? या विजयावर गर्व केला जाऊ शकतो?
याआधी चेन्नईच खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही खूप रोमांचकारी क्षण अनुभवता आले नाहीत.
अशाच काही प्रश्नांची उत्तरं देताना क्रिकेट समीक्षक अयाज मेमन म्हणतात की अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये पिचची फार मोठी भूमिका असते. तसं तर पिचला दोष दिला जाऊ शकत नाही, पण उत्तमोत्तम बॅट्समन असताना फक्त बॉल फेकला तरी समोरचा आऊट होऊन विजयाची शाश्वती असेल तर ही गोष्ट योग्य नाही.
अयाज मेमन म्हणतात की, "मॅचच्या दुसऱ्या दिवशी एकाच डावात भारताच्या सात विकेट पडल्या ही गोष्ट आश्चर्यकारक आहेच पण त्याहूनही आश्चर्यकारक आहे जेम्स अँडरसन, ख्रिस ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर असताना जो रूटने पाच विकेट घेणं."
या पिचवर फक्त इंग्लंडचे जो रूट आणि बेन स्टोक्ससारखे बॅट्समन हैराण झाले असं नाहीये, तर भारताचे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराही हैराण झाले. चेतेश्वर पुजाराला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही.
'फक्त जिंकण्यासाठी पिच बनवणं योग्य नाही'
एक असं पिच ज्यावर स्पिनरला फक्त सरळ बॉलिंग करायची आहे, टेस्ट मॅचसाठी योग्य आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देताना अयाज मेमन म्हणतात की "फक्त रेकॉर्ड बनवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी असं पिच बनवणं योग्य नाही. प्रेक्षक चांगला खेळ पाहायला मैदानात आलेले असतात. अशा विकेटवर बॅट्समनला समजतच नाही की पुढे खेळायचं की मागे."
"या पिचकडे पाहून अॅडिलेड टेस्टची आठवण झाली जेव्हा भारताचा खेळ अवघ्या 36 रन्समध्ये आटोपला होता. अहमदाबादचं पिच खराब होतंच पण त्याबरोबरीने ते पिचही खराब असतं ज्याला पाटा विकेट किंवा पाटा खेळपट्टी असं म्हटलं जातं. यात विकेटवर बॉलर्सला काहीही मदत मिळत नाही आणि बॅट्समन खोऱ्याने रन करतात. टेस्ट क्रिकेटमध्ये अशी विकेट हवी जिचा फायदा बॅट्समन आणि बॉलर दोघांना होईल."
जेव्हा इंग्लंड टॉस जिंकून आधी बॅटिंग करत होतं तेव्हा भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर आणि माजी बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणत होते की इंग्लंडचे बॅट्समन स्पिनरला बॅकफूटवर खेळायचं ठरवून खेळत आहेत.
त्यांचं म्हणणं खरंही असेल पण त्यांनी मोकळ्या मनाने हे मान्य केलं की इंग्लंड बचावात्मक खेळलं पण विकेट काहीशी अशी होती की त्यावर बॉलर्सला विशेषतः स्पिनर्सला फक्त सरळ बॉल टाकायचा होता.
ज्या पिचवर इंग्लंडचे जो रूट, जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स अडखळले त्याच विकेटवर भारताचे बॅट्समनही नवशिक्यासारखे खेळत होते. प्रत्येक बॉलवर विकेट पडायचा धोका असतो तेव्हा मॅच आणखी रोमांचक होते असं अयाज मेमन म्हणतात. अशा पिचवर केलेला संघर्ष खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे.
"अशा क्रिकेटने टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढते. शेवटच्या बॉलपर्यंत लोकांच्या हृदयाचे ठोके वाढत राहतात," ते म्हणतात.
अहमदाबादमध्ये दोन दिवसात भारताचा जो विजय झाला त्याबद्दल बोलताना माजी निवडकर्ता आणि बॅट्समन अशोक मल्होत्रा म्हणतात की भारतीय टीमला या विजयाचा गर्व असेल पण या गोष्टीने मन खट्टू होतंय."
ते म्हणतात, "आज भारताची टीम प्रतिभावंत खेळाडूंची टीम आहे, ही सत्तरच्या दशकातली कमजोर टीम नाहीये. पुर्वी जिंकण्यासाठी असे पिच बनवले जायचे, आता त्यांची गरज नाहीये. दुसरं म्हणजे प्रेक्षकही पाच दिवसांचा खेळ बघायला पैसै देऊन तिकिट विकत घेतात. मग अशा आखाडा विकेटचा काय फायदा ज्यावर दोन दिवसही बॅट्समन खेळू शकत नाहीत?"
अशोक मल्होत्रा अशा विकेटवर बॉलर्सलाही थोडं श्रेय देतात आणि म्हणतात की भारतीय बॉलर्सने योग्य टप्प्याची बॉलिंग केली, हे सोपं नव्हतं. पण अशा पिचचे परिणाम मनाला आनंद देत नाहीत.
ते म्हणतात पुढची मॅच अशाच विकेटवर होणार आहे. त्यांना वाटतं की इंग्लंडने पहिल्या डावात 250 किंवा 270 रन्स बनवले तर भारत हारूही शकतो.
अहमदाबादच्या मॅचमध्ये इंग्लंडचा डाव स्वस्तात गुंडाळला गेला याहीपेक्षा भारताचा डाव फक्त 145 रन्समध्ये आवरला या गोष्टीने जास्त आश्चर्यचकित झालेत.
अशोक मल्होत्रा पुढे अजून एक मोठी गोष्ट सांगतात की टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असताना पिंक बॉल, डे-नाईट मॅचच्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्या बोलण्याचं किती महत्त्व राहील जर मॅचच दोन दिवसांत संपून जातील?
ते काहीही असो, पिचने भारताच्या निर्भेळ यशावर साशंकता निर्माण केली हे नक्की.
अहमदाबादच्या विकेटच्या उडणाऱ्या धुळीने नव्या स्टेडियमच्या प्रतिमेलाही धक्का लावला आहे जिथे लाखो प्रेक्षक मॅच पाहू तर शकले पण दोन दिवसांच्या क्रिकेटने कोणाचं समाधान झालं नाही.