साहित्य संमेलन : फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून विरोध करणं किती योग्य?

शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (10:57 IST)
अमृता दुर्वे
फादर फ्रान्सिस दिब्रिटोंची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या निवडीचा निषेध करणारे, धमक्यांचे फोन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आल्याचं वृत्तही आलं.
 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चन धर्मगुरू आहेत त्यामुळे त्यांची निवड आक्षेपार्ह ठरते असं मत व्यक्त करत ठाणे, मुंबई, पुणे, परळी अशा शहरातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना फोन येऊ लागले होते.
 
विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी दिब्रिटो यांना विरोध केला आहे. दिब्रिटो यांची निवड करणे म्हणजे साहित्यिकांच्या दिवाळीखोरीचे लक्षण असल्याचं ते म्हणाले आहेत.
 
दिब्रिटोंच्या धर्मगुरू असण्यावरून सुरू झालेल्या या वादावर सोशल मीडियातून काही प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी साहित्यिकांनी मात्र या निवडीचं समर्थन केलंय.
 
"फादर दिब्रिटो यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांची जी सेवा केली आहे ती लक्षात घेता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड योग्य आणि अभिनंदनीय आहे," असं निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
'फादर दिब्रिटो हे लेखक म्हणून येतील'
दिब्रिटोंची निवड योग्य असल्याचं सांगत माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले म्हणाले, "महामंडळाची भूमिका सर्वसमावेशक आहे. दिब्रिटो मराठीतले मान्यवर लेखक आहेत, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. अशा धमक्या येणं दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या लोकांचा मी निषेध करतो. आतापर्यंत जे लोक अध्यक्ष झाले त्यामध्ये धर्माभिमानी कोणीच नव्हतं, जातीयवादी कोणीच नव्हतं असं म्हणता येऊ शकतं का? असं म्हणता येणार नाही. फादर दिब्रिटो या संमेलनाला धर्मगुरू म्हणून येणार नाहीत तर लेखक म्हणून, अध्यक्ष म्हणून येतील."
 
"दिब्रिटोंच्या निवडीला झालेला विरोध हा सोशल मीडियावर झालेला असून त्याबाबत कोणीही अधिकृत भूमिका घेतली नसल्याने त्याला फारसं महत्त्वं देऊ नये," असं मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमलेनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करणाऱ्या राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगांवकर म्हणाले, "फादर दिब्रिटोंची अध्यक्षपदी निवड झाली याचा आनंदच आहे. त्यांचं वेगळेपण असं की त्यांनी त्यांचं फादर असणं चर्चच्या चार भिंतींत कोंडून न ठेवता ज्या समाजाशी त्यांचा संबंध आहे, त्याच्याशी जोडून घेतलं. ख्रिश्चन परिसरामध्ये मराठीचा प्रसार - प्रचार त्यांनी केला. ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संत परंपरेतून त्यांनी त्यांचं अध्यात्म, त्यातला रसाळपणा अगदी अलगदपणे उचलला आणि स्वतःच्या लिखाणात आणला."
 
'दिब्रिटो यांचं साहित्य एका चौकटीत अडकलेलं नाही'
लेखिका यशोधरा काटकर म्हणतात, की मराठी साहित्यात ख्रिस्ती साहित्याचा एका मोठा प्रवाह एका शांत अंतःस्तरासारखा वाहत आला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही इतका तो समृद्ध आहे. त्या म्हणतात, "फादर दिब्रिटोंचा धर्मविचार आणि कर्मविचार धर्मकार्य -पर्यावरण संरक्षण - भाषा -साहित्य-संस्कृती समृद्धी या मार्गाने जातो. तो चर्चच्या चार भिंतीत व बायबलमध्ये बंदिस्त नाही. तो समाजहिताचा व्यापक विचार करतो , असं मला नेहमीच जाणवत आलं आहे.
 
धर्मगुरू बनणे त्यांनी करियर म्हणून स्वीकारले, ते उत्तम पार पाडले पण त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ते लढले. त्यांनी मराठी साहित्याचा उत्तम व्यासंग केला आणि मराठी भाषा आणि साहित्यात आपली ओळख निर्माण केली. त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यामुळे या पदाची उंची वाढेल. त्यांच्याकडून आपल्याला काही नवा विचार, नवी दिशा देणारे मिळेल अशी आशा करूया."
राजकीय नेते काय म्हणतात?
दिब्रिटो यांच्या नावाची निवड झाल्यानंतर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "
 
"सामाजिक - साहित्यिक कार्याच्या मिलाफातून मराठी साहित्य वैश्विक करणाऱ्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे." पुढे ते म्हणतात आगामी साहित्य संमेलनासाठी दिब्रिटो यांना अभिनंदन आणि शुभेच्छा.
 
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांनी देखील दिब्रिटो यांच्या निवडीवर आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती