ई. श्रीधरन केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
गुरूवार, 4 मार्च 2021 (18:08 IST)
इमरान कुरेशी
बीबीसी हिंदीसाठी
भारतीय जनता पक्षाचे केरळचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांची निवड करण्यात आली आहे.
केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी ई. श्रीधरन यांच्या नावाची घोषणा केली.
येत्या एप्रिल महिन्यात केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मेट्रो मॅन श्रीधरन यांचा चेहरा पुढे केला आहे.
दिल्ली मेट्रोचं प्रमुख सल्लागार पद सोडून मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
आगामी काही महिन्यांमध्ये केरळमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून उभे राहणार आहेत.
89 वर्षांचे इंजिनिअर ई. श्रीधरन यांचा चेहरा भारतात सर्वत्र परिचित आहे. त्यांना भारतातील दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यासाठी ओळखलं जातं.
कोकण रेल्वेची यशस्वी बांधणी केल्यानंतर त्यांचं नाव देशभरात सर्वत्र पोहोचलं होतं
ई. श्रीधरन यांनी गुरुवारी (18 फेब्रुवारी) आपल्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. बीबीसी हिंदीशी बोलताना ते म्हणाले, "मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवावी, असं पक्षाला वाटतं. अद्याप मतदारसंघ ठरलेला नाही."
राजकारणात येण्याचं कारण सांगताना श्रीधरन म्हणतात, "तुम्हाला देशाची चांगली सेवा करायची असेल तर राजकारण हा एक आदर्श मार्ग आहे. तुम्ही टेक्नोक्रॅटच्या तुलनेत जास्त सेवा करू शकता. इतकी वर्षे मी सरकारी सेवेत असल्यामुळे मला ही गोष्ट समजली नव्हती. पण तो आता काळ बदलला आहे. मला वाटतं मी अजूनही देशासाठी काहीतरी करू शकतो.
श्रीधरन यांचा दिल्ली मेट्रोच्या सल्लागारपदाचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. पण त्याआधीच ते पद सोडू शकतात. कारण, एप्रिल-मे महिन्यात केरळमध्ये निवडणुका होऊ शकतात.
गेल्या तीन-चार महिन्यांच्या दरम्यानच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच मी त्यांचा चाहता होतो. मी मोदी आणि भाजपवर प्रेम करणारा एक उत्साही प्रशंसक आहे, असं श्रीधरन म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी श्रीधरन यांची पंतप्रधान मोदींसोबत काही चर्चा झाली का, हा प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तरले, "नाही. त्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलं नाही. त्यांच्याशी माझी काहीच चर्चा झाली नाही."
अशा स्थितीत केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीधरन यांची नजर कोणत्या मुद्द्यावर असेल?
या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, "मी केरळचा इंफ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर राज्यातील उद्योगधंद्यांचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा मांडीन. गेल्या 30 वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग स्थापन झाला नाही. श्रमिक आणि कामगार संघटनांची वागणूक अतिशय आक्रमक आहे. त्यामुळे राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून बेरोजगारीची समस्या आहे."
केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येण्याची किती अपेक्षा आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीधरन म्हणतात, "भाजप सत्तेत येऊ शकतो. मी भाजप प्रवेश केल्याचं कळल्यानंतर अनेकजण भाजपमध्ये येतील. पाठिंबा देतील. कोणाच्या प्रशासनात प्रगती होऊ शकते, हे लोकांना माहीत आहे. इथं शासन-व्यवस्था पंगु झाली आहे. केरळमध्ये एका चांगल्या सरकारची गरज आहे. भाजप इथं एक स्थिर सरकार देण्यात सक्षम आहे."
श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोसाठी काम सुरू केलं होतं, तेव्हा ते पहाटे चार वाजता उठून ध्यानधारणा करायचे. अजूनही त्यांची दिनचर्या अशीच असते का?
ते सांगतात, "सध्या मी आधीसारखं कठोरपणे तर करत नाही. पण पहाटे पाच वाजता उठतो. सकाळी योगा करतो. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवतो. लंचनंतर एक तास विश्रांती घेतो. संध्याकाळी फिरतो."
राष्ट्रीय पातळीवर इंफ्रास्ट्रक्चरची निर्मिती करण्याच्या अनुभवाचा वापर विधानसभेऐवजी संसदेत अधिक चांगल्या पद्धतीने करता आला असता का, याबद्दल बोलताना श्रीधरन म्हणाले, "राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका तीन वर्षांनी होणार आहेत, त्याच्याआधी या निवडणुका होतील."