'Dr Bomb': जलीस अन्सारी - पॅरोलच्या अखेरच्या दिवशी गायब झालेल्या 'डॉ. बाँब'ला कानपूरमध्ये अटक

शनिवार, 18 जानेवारी 2020 (14:22 IST)
देशभरातल्या वेगवेगळ्या साखळी बाँबस्फोट प्रकरणांत दोषी ठरवण्यात आलेला आणि 'डॉ. बॉम्ब' अशी ओळख असलेला डॉ जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.
 
पॅरोलवर बाहेर आलेला अन्सारी मुंबईमधून गायब झाल्यानंतर पोलिसांनी मोठी शोधमोहीम सुरू केली होती.
 
मूळचा मुंबईचा असलेला आणि सध्या अजमेर येथील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉ. अन्सारी पॅरोलवर बाहेर होता.
 
गुरुवारी तो अचानक गायब झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि 'महाराष्ट्र एटीएस' सहीत सर्व विभागांना अलर्ट देण्यात आला असून शोधमोहीम सुरू झाली.
 
मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला असून शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे. "अन्सारी हा 21 दिवसांच्या पॅरोलवर होता आणि यापूर्वीच काही महत्त्वाच्या बाँबस्फोट प्रकरणांमध्ये त्याला दोषीही ठरवण्यात आलं आहे. काल तो गायब झाल्यानंतर सगळ्या पोलीस ठाण्यांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत," असं या अधिकाऱ्याने नाव व सांगण्याच्या अटीवर 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं.
 
'नमाजला चाललोय म्हणून निघून गेले'
डॉ. अन्सारी हा दक्षिण मुंबईतील मोमिनपाड्याचा रहिवासी आहे आणि पेरॉलवर संपून शुक्रवारी त्यानं अजमेर तुरुंगात परतणं अपेक्षित होतं. पण गुरुवारी नमाजासाठी संध्याकाळी बाहेर पडल्यावर तो परतला नाही आणि संपर्कही होऊ शकला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी आग्रीपाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.
 
"नमाज पढायला चाललोय असं सांगून ते दुपारी 4 ला ते घरून निघाले, मात्र जेव्हा 8.30-9पर्यंत ते आले नाही, तेव्हा आम्हाला कळलं की ते पळालेत. तेव्हा आम्ही लगेच पोलिसांना जाऊन सारंकाही सांगितलं की ते आपलं सारं सामान घेऊन घरून निघून गेले आहेत," असं जलील अंसारीचा मुलगा झैद अन्सारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
"ते पसार झाल्याचं कळाल्यापासून आम्ही स्वतः खूप त्रस्त आहोत. आम्हालाचा आता वाटतं की त्यांना अटक व्हावी. आम्हीच थकलोय आता.
 
"माझ्या अम्मीला त्रास सहन करावा लागतोय. आम्ही खूपच वैतागलोय आता. आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत," असंही ते म्हणाले.
 
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 28 डिसेंबरला त्याला पॅरोल मिळाला होता तो 17 जानेवारी रोजी संपुष्टात येणार होता.
 
डॉ जलीस अन्सारी याचे बंदी घालण्यात आलेल्या संघटना इंडियन मुजाहिदीन, सिमी, हरकत-उल-मुजाहिदीन यांच्याशी संबंध होते. आणि ट्रेनिंगनंतर तो बाँब बनवण्यात तज्ज्ञ झाला, असं सांगण्यात येतं.
 
तो पेशानं डॉक्टरही होता. त्यामुळे या नेटवर्कमध्ये तो 'डॉ. बाँब' म्हणून ओळखला जायचा.
 
देशभरातल्या विविध शहरांतल्या साखळी बाँबस्फोटांशी त्याचा संबंध असल्याचं उघड झालं होतं. जयपूर, अजमेर आणि मालेगांव इथे झालेल्या स्फोटांच्या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर अजमेर येथील तुरुंगात तो जन्मठेपेशी शिक्षा भोगत होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती