कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक, डीके शिवकुमार यांना हॉटेलबाहेर रोखलं
कर्नाटकात सुरू असलेलं राजकीय नाट्य आता चांगलंच रंगलं आहे. राजीनामा दिलेले आमदार मुंबईमधील हॉटेल रेनेसाँमध्ये थांबले आहेत.
या आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि मंत्री डीके शिवकुमार मुंबईमध्ये पोहोचले आहेत. मात्र आमदारांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं आहे. तसंच डीके शिवकुमार यांचं रेनेसाँ हॉटेलचं बुकिंग रद्द करण्यात आलं आहे. माझ्यासारख्या पाहुण्यांवर त्यांना गर्व असायला हवा. पण ठीक आहे. मला जाण्यासाठी इतरही जागा आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मात्र आमदारांनी आपल्याला या नेत्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचं सांगत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दहा आमदारांनी यासंबंधी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. जेडीएसचे आमदार शिवालिंगे गौडा आणि काँग्रेस आमदार डीके शिवकुमार हे मुंबईला येत असून त्यांच्या येण्यामुळं आम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं या प्रकरणी आम्हाला मदत करावी आणि त्यांना हॉटेलमध्ये येऊ देऊ नये, असं आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे तसंच ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष जाणूनबाजून राजीनामे स्वीकारण्यास उशीर करत आहेत आणि कर्तव्यात कसूर करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात चर्चा होणार आहे.
या पत्रानंतर रेनेसाँ हॉटेल बाहेर महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे पोलिस कर्मचारी आणि तसंच दंगल नियंत्रक टीम तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान हॉटेलबाहेर पोलिसांनी अडवल्यानंतर ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवकुमार यांनी सांगितलं, की मी इथं एक रुम बुक केली आहे. माझे मित्रही इथं थांबले आहेत. छोटीशी समस्या आहे, आम्ही एकमेकांशी चर्चा करून सोडवू. यामध्ये धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, आदर करतो.
शनिवारी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमधील 13 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कर्नाटकातील सरकार केव्हाही कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी 10 आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत.
काँग्रेस-जेडीएस आपलं सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून डीके शिवकुमार यांना शिष्टाईसाठी पाठविण्यात आलं आहे. यापूर्वीही शिवकुमार यांनी काँग्रेसला अशाप्रकारच्या अडचणीतून बाहेर काढलं आहे.
डी.के. शिवकुमार कोण आहेत?
मागच्या वर्षी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 17मे ला कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा भाजपाकडे 104 जागा होत्या आणि बहुमतासाठी त्यांना 112 जागा हव्या होत्या . बहुमतासाठी बरेच प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य झालं नाही. त्यावेळी काँग्रेसकडून सगळी व्यवस्था झाली होती. ही व्यवस्था करणारे नेते होते डी.के. शिवकुमार.
शिवकुमार वोक्कालिंगा समुदायाचे नेते आहे. कर्नाटकात ते डी.के.एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत.
गेल्या वर्षी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सामील होत होते. पक्षाचे चाणक्य आणि गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे अहमद पटेल यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं होतं. तेव्हा सर्व आमदारांना इगलटन रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं. हे रिसॉर्ट शिवकुमार यांच्या मालकीचं होतं. तिथे सर्व आमदारांना ठेवण्यात आलं. त्यामुळे अहमद पटेल यांच्या विजयाला हातभार लावला.
2002 मध्येही जेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार धोक्यात आलं तेव्हाही महाराष्ट्रातल्या आमदारांना तिथेच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकार वाचलं. त्यामुळे एकूणच हे रिसॉर्ट काँग्रेससाठी लकी आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
राजकीय पटलावर उदय
डीके शिवकुमार आज काँग्रेसबरोबर असले तरी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. 1985 मध्ये त्यांनी वोक्कालिंगा समाजाचे मोठे नेते एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध वयाच्या पंचविसाव्या वर्षी शड्डू ठोकला होता.
या निवडणुकीत देवेगौडा मतदारसंघातून लढले आणि दोन्ही जागांवर त्यांना विजय मिळाला. त्यांपैकी सातनूरची जागा त्यांनी सोडली. याच मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणूक लढवून शिवकुमार विजयी झाले. 1989 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले आणि बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.
1999 मध्ये त्यांनी पुन्हा देवेगौडा परिवाराविरुद्ध निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी एच.डी. कुमारास्वामी यांचा पराभव केला. शिवकुमार यांचं राजकीय वजन तेव्हापर्यंत बरंच वाढलं होतं.
गांधी कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध
महाराष्ट्र सरकार वाचवण्यात हातभार लावल्यापासून गांधी कुटुंबियांशी त्यांची जवळीक वाढली. ते काँग्रेसचे संकटमोचक झाले. 2009 मध्ये ते कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी 250 कोटींची संपत्ती असल्याचं निवडणूक शपथपत्रात जाहीर केलं. ते कर्नाटकातील सगळ्यात श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही होते.
गुजरातच्या आमदारांना रिसॉर्टवर थांबवण्याच्या प्रकरणी त्यांच्या रिसॉर्टवर आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हा तिथे काही मिळालं नसलं तरी त्यांच्या दिल्लीच्या घरातून 7.5 कोटी सापडले होते.
पुन्हा एकदा संकटमोचक
मागच्या वर्षी जेव्हा कर्नाटकात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तेव्हाही शिवकुमार यांचं महत्त्व अधोरेखित झालं. विश्वासमताच्या वेळी काँग्रेसचे दोन आमदार प्रताप गौडा पाटील आणि आनंद सिंह बेपत्ता होते. भाजपाने त्यांचं अपहरण केलं असा त्यांनी आरोप केला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जेव्हा विधानसभा अध्यक्ष मोजणी करत होते तेव्हा हे दोन्ही आमदार विधानसभेत आले.
शिवकुमार तेव्हा अगदी प्रवेशद्वारावर उभे होते. भाजपची मदार याच दोन आमदारांवर होती. हे आमदार जेव्हा आले तेव्हा त्यांनी शिवकुमारांकडे दुर्लक्ष केलं. नंतर दुपारी हे आमदार आणि शिवकुमार एकत्र जेवताना दिसले.
आज थोड्याफार फरकाने अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवकुमार मुंबईत आहेत. यावेळीही ते काँग्रेसचं सरकार वाचवण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.