राजगृह : हल्ला झाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर आतून कसं आहे?

गुरूवार, 9 जुलै 2020 (13:46 IST)
-अमृता दुर्वे
मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.
 
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन या घटनेनंतर म्हटलं आहे.
 
"राजगृहाचया आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तिर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून हा "हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल," अशी माहिती दिली आहे.
 
या हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.
 
मंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी ही तोडफोड केली आहे. यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय.
 
राजगृह कसं आहे?
बाबासाहेबांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतलं राजगृह. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर दादरमधली ही वास्तू बांधून घेतली होती.
 
बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतलं होतं.
 
1931 ते 1933 दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली.
राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे.
 
डॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथं ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातलं फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत.
या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचं टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत.
 
डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या छड्या (Walking Sticks) जमवण्याचाही छंद होता.
 
वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत.
 
सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय.
शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारे फोटोग्राफ्स आहेत.
 
राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही आहे.
 
दादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आलं होतं.
 
ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथंच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि नंतर इथूनच 7 डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं.
 
अंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात आणण्यात आल्या. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे.
राजगृहाच्या वास्तूतलं तळमजल्यावरचं हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं असतं तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात.
 
6 डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही येऊन जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती