अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग कोच
बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (16:38 IST)
पराग फाटक
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात एक मुंबईकर पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ असं वर्णन होणारा अमोल दक्षिण आफ्रिकेचा बॅटिंग कोच ही जबाबदारी सांभाळणार आहे.
आचरेकर सरांकडे आम्ही क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. खेळताना आणि आता कोचिंग करताना तोच वारसा, ती शिकवण रुजवण्याचा प्रयत्न असेल असं माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे बॅटिंग कोच अमोल मुझुमदार यांनी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. याआधीच्या दौऱ्यात भारतीय गोलंदाजीसमोर उडालेली त्रेधातिरपीट लक्षात घेऊन यावेळी दक्षिण आफ्रिकेने इथल्या खेळपट्यांचा आणि भारतीय खेळाडूंचा सखोल अभ्यास असलेल्या अमोल यांना आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सर्वसाधारण अशीच झाली. त्यांना बाद फेरीही गाठता आली नाही. या निराशाजनक प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. एनॉच क्वे हे मुख्य कोच आहेत. व्हिन्सेंट बार्न्स बॉलिंग कोच म्हणून तर जस्टीन ऑन्टॉंग फिल्डिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान अमोल दक्षिण आफ्रिकेच्या पॅव्हेलियनमध्ये दिसतील. गेली अनेक वर्ष भारताचे प्रसन्न अगोराम दक्षिण आफ्रिका संघाचे परफॉर्मन्स अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये कसा प्रवेश झाला याची आठवण अमोल यांनी सांगितली. ''दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा 'अ' संघ भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी त्या संघातील काही खेळाडू मुंबईत आले होते. छोटेखानी खाजगी कॅंप आयोजित करण्यात आला होता. मी त्याचा भाग होतो. भारतीय संघाचे बॅटिंग कोच विक्रम राठोडही होते. आम्ही त्या बॅट्समनना काही गोष्टी सांगितल्या. त्यांना ते आवडलं आणि पटलं. कॅंप संपला पण एडन मारक्रम, तेंबा बावूमा, थेअुनस डि ब्रुआन यांच्याशी संपर्क कायम राहिला.
कॉमेंट्रीदरम्यानही ते मला भेटत असत. त्यांच्याशी ऋणानुबंध तयार झाला. भारतीय वातावरणात इथल्या आव्हानात्मक खेळपट्यांवर खेळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मी देऊ शकतो असं त्यांना वाटलं असावं. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका बोर्डाने विचारणा केली. मी भारतीय संघाच्या बॅटिंग कोच पदासाठी अर्ज केला होता. तिथे निवड होणार नाही स्पष्ट झाल्यानंतर मी आफ्रिकन बोर्डाला कळवलं. उपलब्धतेविषयी चर्चा केल्यानंतर नियुक्ती पक्की झाली''.
भारतीय संघाचा बॅटिंग कोच म्हणून निवड झाली नाही याची खंत वाटत नाही असंही अमोल सांगतात. ते पुढे सांगतात, 'माझी कारकीर्द विविधांगी आहे. एखाद्या गोष्टीबाबत मी स्वत:ला बंदिस्त केलेलं नाही. इंग्लंड आणि नेदरलँड्समध्ये कोचिंगचं काम पाहिलं आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीत U19, U23 संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केलं. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा बॅटिंग कोच आहे. याव्यतिरिक्त मी क्रिकेटवर बोलण्याचं म्हणजे कॉमेंट्रीही करतो'.
भारतीय व्यक्ती आता हळूहळू अन्य संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये दिसू लागले आहेत. श्रीधरन श्रीराम ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर असतात. सुनील जोशी बांगलादेश संघाचे स्पिन सल्लागार होते. अमोल यांचे सहकारी वासिम जाफर बांगलादेशच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचा भाग आहेत. लालचंद राजपूत यांनी झिंबाब्वे तसंच अफगाणिस्तान संघांचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. या यादीत आता अमोल यांचा समावेश होणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघावर 'चोकर्स' म्हणजे मोक्याच्या क्षणी कच खाणारे असा शिक्का आहे. 'मला त्याची कल्पना आहे. परंतु इतिहासात काय घडलंय यावर मी लक्ष केंद्रित करणार नाही. आफ्रिकेचा संघ संक्रमण स्थितीत आहे. एबी डी व्हिलियर्स, हशीम अमला, जेपी ड्युमिनी असे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाले आहेत. नवीन खेळाडूंचा संघ आहे.
भारत दौरा खडतर आहे. पण हीच संधीही आहे. अति महत्वाकांक्षी होण्यापेक्षा व्यवहार्य दृष्टिकोन अंगीकारणं आवश्यक आहे. काही खेळाडूंना समोर ठेऊन डावपेच तयार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत ते दिसतील'.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अमोल यांच्या नावावर दहा हजारहून अधिक धावा आहेत. आठवेळा रणजी विजेत्या मुंबई संघाचा ते अविभाज्य घटक होते. मुंबईकर खेळाडू खडूसपणासाठी ओळखले जातात.
हा खडूसपणा दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगमध्ये दिसणार का? यावर अमोल म्हणतात, 'मुंबईसाठी खेळत असताना विशिष्ट संस्कृती भिनली होती. कोच झाल्यावर माझी भूमिका बदलली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची संस्कृती विविधांगी आहे. त्याच्याशी मला जुळवून घ्यायचं आहे. ही भूमिका आव्हानात्मक आहे पण मी विचारपूर्वक त्याचा स्वीकार केला आहे'.