तिसर्‍या वर्ल्डकप (1983)चा इतिहास

शनिवार, 7 फेब्रुवारी 2015 (15:46 IST)
तिसरी विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये 1983 साली खेळविण्यात आली. 1975 आणि 1979 च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्यात. मात्र या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. 25 जून 1983 रोजी भारताने प्रथमच वर्ल्डकप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिाचा पराभव करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळविण्याचा मान भारताच्या रॉजर बिन्नीला मिळाला.
 
साखळी सामन्यात भारताने बलाढय़ अशा वेस्ट इंडीजचा पराभव केला. विंडीजचा तो विश्वचषकातील पहिलाच पराभव ठरला. 9 जून 1983 रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली. वेस्ट इंडीजने साखळीतील दुसर्‍या लढतीत भारताविरुध्द पराभवाची परतफेड करत पुन्हा वर्चस्व सिध्द केले. झिम्बाब्वेने या स्पर्धेच्या पहिलच्या दिवशी खळबळ उडवून दिली. कसोटीचा दर्जा नसतानाही आणि विश्वचषकातील पहिला सामना खेळताना या संघाने कांगारूंची शिकार केली. सध्याच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळविला. यात फ्लेचर यांची अष्टपैलू कामगिरी (नाबाद 69 धावा आणि 4 बळी) मोलाची ठरली. भारताविरुध्ददेखील झिम्बाब्वेने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. 5 बाद 17 अशी भारताची अवस्था करून या संघाने चांगली सुरुवात केली. मात्र कपिलदेवने 175 धावांची नाबाद खेळी करून भारताला 266 धावापर्यंत पोहोचविले. अवघ 138 चेंडूत त्याने ही खेळी साकारली. 
 
अंतिम फेरीपूर्वी टीम इंडिापुढे यजमान इंग्लंडचे आव्हान होते. दुसरीकडे साखळीतील 6 पैकी 5 सामने जिंकून इंग्लंड जबरदस्त फॉर्मात  होते. भारताविरुध्द मात्र कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांच्या तिखट मार्‍यासमोर इंग्लंडचे फलंदाज केवळ 213 धावांमध्ये   गारद झाले. यशपाल शर्मा आणि संदीप पाटील यांच्या अर्धशतकामुळे भारताने हे विजयी लक्ष्य आरामात गाठले. भारत प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. उपांत्य फेरीत विंडीजने पाकिस्तानला सहज नमवून अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील फायनल सामना भारत आणि बलाढय़ अशा वेस्ट इंडीज संघात झाला. लॉर्डस् मैदानावर दोन वेळा वेस्ट इंडीजने अत्यंत रुबाबात विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडीज संघाला पराभूत करणे सोपे नव्हते. या सामन्यात फलंदाजी करणार्‍या भारतासमोर रॉबर्टस्, गार्नर, मार्श, होल्डिंग या अत्यंत वेगवान गोलंदाजांचे आव्हान होते. अशा स्थितीत भारतीय संघाने चिवटपणे प्रतिकार करून 183 धावा केल्या. ग्रिनीज, हेन्स, व्हीव्हीन रिचर्डस्, लॉईड यासारख्या दिग्गज फलंदाजांना हे माफक आव्हान गाठणे कठीण नव्हते. मात्र कर्णधार कपिलदेवने सर्वाना योग्प्रकारे मार्गदर्शन केले. मदनलालच्या गोलंदाजीवर 18 ते 20 यार्ड मागे धावत जाऊन कपिलदेवने व्हीव्हीन रिचर्डस्चा घेतलेला झेल या सामन्याच्या सर्वात मोठा टर्निग पॉईट ठरला. कारण रिचर्डस्ने दुसर्‍या साखळी सामन्यात भारताविरुध्द शतकीय खेळी साकारली होती. त्याला लवकर बाद करणे महत्त्वाचे ठरले. 
 
भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मदनलाल, अमरनाथ, संधू या गोलंदाजांची कामगिरी मोलाची ठरली. बलाढय़ अशा वेस्ट इंडीजचा केवळ 140 धावांत खुर्दा उडाला. त्याकाळी घरोघरी टी.व्ही. नव्हता. रेडिओसमोर बसूनच भारतीयांनी या जेतेपदाचा आनंद लुटला. या विश्वचषकाचा आनंद कसा लुटला हे सांगणारी मंडळी आजूबाजूला दिसतात. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीयांनी वर्ल्डकप आपल्या खिशात घातला.                                                                                              

वेबदुनिया वर वाचा