आता चंद्राचे कूळ शोधणार!

चंद्रावर सापडलेल्या पाण्याचे मूळ शोधता शोधता आता चंद्राचेच कूळ शोधण्यापर्यंत शास्त्रज्ञांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. चंद्रावर पाणी सापडल्यानंतर आता चंद्रच मुळात कसा तयार झाला याचा शोध घेणे सुकर होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून चंद्रावरचे पाणी म्हणजे चांद्र शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब होती, असे नासाच्या प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजनचे संचालक जीम ग्रीन यांनी सांगितले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) मदतीने आम्ही हे साध्य करू शकलो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

चंद्रावरील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी नासाने मून मिनरॉलॉजी मॅपर अर्थात एम३ हे छोटेसे उपकरण गेल्या २२ ऑक्टोबरला चांद्रयानासोबत पाठवले होते. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या उपकरणातील सेक्ट्रोमीटरने चंद्राकडून परावर्तित होणार्‍या प्रकाशाच्या किरणांचा अभ्यास सुरू केला. यामुळे चंद्राच्या भूभागात नेमके काय आहे, हे कळणे स्पष्ट होणार होते. स्पेक्ट्रोमीटरने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर चंद्राच्या पृष्टभागावरून परावर्तित होणार्‍या प्रकाश लहरीतील सातत्य आणि प्रकाश शोषणावरून या पृष्ठभागावर पाण्याचे घटक आणि हायड्रोक्साईल असणार याची खात्री पटली.

चंद्रावरच्या वालुकामय पदार्थांत पाणी वाटावेत किंवा हायड्रोक्साईल असलेले घटक सापडले. पण याचा अर्थ पृथ्वीवर असते तसे समुद्र, तळे किंवा थेंब या स्वरूपात हे पाणी नाही. तर पाण्याचे कण या स्वरूपातले पाणी सापडले आहे.

वास्तविक यापूर्वीही म्हणजे १९९९ मध्ये केलेल्या एका कॅसिनी फ्लायबाय या चांद्रमोहिमेतही पाण्याचे कण सापडल्याचे बोलले जात होते. मात्र, या शोधाचे अंतिम निष्कर्ष प्रकाशित झाले नव्हते. कॅसिनी या यानातील व्हीआयएमएस आणि चांद्रयानातील एम-३ या दोन्ही उपकरणाने मिळवलेल्या माहितीत खूप साम्य असल्याचेही आढळून आले आहे.

या पलीकडे जाऊन आपल्या निष्कर्षाची खातरजमा करण्यासाठी सध्या चंद्राच्या मागच्या भागात असलेल्या एपोक्सी मोहिमेत मिळालेल्या माहितीचाही आधार घेतला असता. त्यानेही शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षाला पुष्टी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा