तुकाराम महाराजांची चतु: जन्मशताब्दी यावर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने देशभर साजरी झाली. या निमित्ताने तुकारामाच्या वाङ्मयीन अनेक संदर्भात चर्चा झाली. प्रस्तुत लेखात आधुनिक मराठी कवितेवर पडलेला तुकारामांचा प्रभाव स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अभंगवाणी प्रसिद्ध तुकायाची, असे आपण म्हणतो. अभंग ही प्राचीन महाराष्ट्री भाषेपासून रूढ असलेल्या ओवीची तेराव्या शतकापासून संतांनी रूढ केलेली रचना असून तुकारामाने अभंगाची शैली पूर्णतेला नेली. तुकारामांच्या अभंगाची रचना वेगवेगळ्या गेय प्रकारांनी समृद्ध आहे. बर्याच वेळा त्यात लोकगीताचे बंधही वापरलेले आढळतात. तुकारामांचे अभंग सध्या आपण बहुधा लिखित किंवा मुद्रित संहितेच्या रूपात पाहतो. मुळात हे अभंग मौखिक स्वरूपात निर्माण झाले. त्यामुळे त्यांची लय कानाने ग्रहण करणे, टाळमृदुंगाच्या तालावर अनुभवणे यात खरी या अभंगाची गोडी आहे. तुकारामांच्या भाषेचा गोडवा श्रवणाने प्रतित होतो. हे एक सांघिक काव्य आहे.
स्वत:च्या कवित्याबद्दल तुकारामाने आपली काही मते मांडली आहेत. ती आपण प्रथम विचारात घेऊ. काव्याच्या बाबतीत त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. हे काव्य अंतरी असून ते स्वभावाने बाहेर पडत आहे. शब्द हे तुकारामांचे धन, रत्न सर्व काही आहे.
आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।
तुकारामांचे मन परिपाकी आहे -
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळीच जिव्हाळा झरवणी।। अर्थांतरी असे अनुभव सेवन । परिपाकी मन साक्ष येथे ।।
तुकारामांचा हा झरा मूळचाच खरा आहे -
उष्ट्या पत्रावळी करूनिया गोळा। दाखविती कळा कवित्वाची।। ऐसे जे पातकी ते नरकी पचती। जोवरी भ्रमती चंद्रसूर्य।।
बोलाचीच कढी आणि बोलाचा भात जेऊन कुणीही तृप्त होत नाही. हे काव्य मी करीत नाही तर -
करितो कवित्व म्हणाला हे कोणी। नव्हे माझी वाणी पदरीची।। माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार। मज विश्वंभर बोलवितो।। काय मी पामर जाणे अर्थभेद। वदवी गोविंद तेचि वदे।।
आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात -
आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची।। साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी। शिकविता धनी वेगळाची।। काय म्या पामरे बोलावी उत्तरे। परि तया विश्वंभरे बोलाविले।। तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा। चालवी पांगळा पायविणा।।
तुकारामांच्या शब्दकळेचे सामर्थ्य पहा -
अति जाळे उत्तम वेश्येचे लावण्य। परि ते सवाशीण न म्हणावी।। काय वस्त्र म्हणे या वो मज नेसा। आपुले स्वइच्छा जग वोढी।। करविली तैसी केली कटकट। वाकडे की नीट देव जाणे।। कोणाकारणे हे जालेसे निर्माण। देवाचे कारण देव जाणे।।
तुकाराम हा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला आणि मुरलेला कवी आहे. गेली 340 वर्षे मराठी भाषिकाच्या धार्मिक आणि सामाजिक विचारांवर तुकारामांचा विलक्षण पगडा आहे. आपण सर्व जी भाषा बोलतो त्यातून तुकारामांचा प्रभाव जाणवतो. तुकारामांचे अभंग हे सर्वसामान्य लोकांचे नैतिक अधिष्ठान असते. विद्वान लोक आपल्या विधानांना बळकटी देण्यासाठी तुकारामांच्या अभंगातील मार्मिक ओळी उद्घृत करीत असतात. तुकारामांची ही अवतरण क्षमता अद्भुत आहे. पुढील उदाहरणे पहा - शुद्धबीजा पोटी। फळे रसाल गोमटी। नाही निर्मल जीवन। काय करील साबण। आधी होता वाध्या। दैव योगे झाला पाग्या। ढेकणाचे संगे हिरा जो भंगला। आलिया भोगासी असावे सादर। एक एक साह्य करू। अवघे धरू सुपंथ। मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया। रात्रींदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग। बोले तैसा चाले त्याची वंदीन पाउले। गाढवही गेले ब्रम्हचर्य गेले। सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे। लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।
तुकाराम महाराज जरी संतसाहित्यात अभंग या रचनाबंधाचा कळस असले तरी त्यांच्यानंतर देखील आध्यात्मिक अनुभूतीच्या प्रकटाने स्वाभाविक साधन म्हणून उत्तरकालीन संतकवीनी तो जागता ठेवला. बहिणाबाई, निळोबा, आधुनिक संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मेर्ढेकर ते अरूण कोल्हटकरपर्यंत हा प्रभाव आपणास जाणवतो.
महात्मा फुले यांच्या अखंडांवरतीसुद्धा हा प्रभाव जाणवतो. आध्यात्मिक आशयापेक्षा सामाजिक आशय स्पष्ट व्हावा म्हणून अभंगांऐवजी अखंड हा शब्द फुले वापरतात. उदाहरणार्थ, दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे। भिक्षान्न मागावे पोटापुरते। सर्वाचा निर्भिक आहे एक धनी। त्याचे भय मनी धरा सर्व।
1917 ते 1919 या आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन वर्षापर्यंत रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी सुमारे 300 अभंग लिहिले. साधकाच्या उन्नतीच्या प्रवासखुणा नोंदवताना त्यांनी अभंग हा रचनाबंध स्वीकारला. टिळकांचा खालील अभंग पहा -
भक्तिमार्गे तुका गेला। मान्य तुम्हा आम्हां झाला। साधु सुंदर त्याचे शील। थोरथोरा लाजवील।। तुका म्हणताच कोणी। प्रेमलहरी माझ्या मनी।। तुका करी उपकार। धर्म झाला घरोघर।। आपास्तांना देई चक्षू। करी जिज्ञासू मुमुक्षू।। तुकानिर्मित सेतुवरूनी। मीही आलो ख्रिस्तचरणी। दास म्हणे साधुसंत। देवे निर्मियेले पंथ।।
बा.सी.मर्ढेकरांना सुद्धा हा रचनाबंध सोयीचा वाटतो. ते लिहितात -
कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ। कुठे तुकाराम पवित्र। कुठे समर्त धीरोदात्त। संत सर्व।। संत शब्दांचे नायक। संत अर्थाचे धुरंधर। एक शब्दांचा किंकर। डफ्फर मी।।
दुसर्या महायुद्धाने माणुसकीला कलंक लागला. याने मर्ढेकर व्यथित होतात आणि लिहितात -
नाही कोणी का कोणाचा। बाप लेक मामा भाचा मग अर्थ काय बेंबीचा। विखचक्री।। माझा अभंग माजी ओवी। नतद्रष्ट गाथा गोवी।
तुकाराम आणि मर्ढेकर यांच्यात साम्य आहे तसा विरोधही आहे. मर्ढेकराच्या खालीत ओळी पहा -
येथे नाही टाळ। मृदं मराळ। नाही नाही माळ। स्फटिकांची।। येथे नाही ध्यान। भक्ति वा भजन। नाही उदासीन। मनोवृत्ति ।।
आता आपण अनिलांचा खालील अभंग पाहूया। तुकारामांचा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरुनिया।। हा अभंग आणि अनिलांचा खालील अभंग पहा. त्यात कधी अनिलांनी तुकरामांच्या मूळ अभंगातील आशयापेक्षा वेगळा आणि नवा आशय त्या प्रकारच्या शब्दरचनेतून व्यक्त केला आहे.
जेथे जातो तेथे तू काय म्हणून सांगती?
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतोना! खूपखूप माझी ऊंची, एकाकीच, माझी मलाच वाढवू दे तुझ्याहून नसली तरी तुझ्या समान होऊ दे
तुकारामच्या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या सारखीच रचना कुसुमाग्रजांची आहे. कुसुमग्रज देवाला विचारतात -
चालविणार तू आता कुठवर । धरूनिया कर मला मागे। तुझा जर मला अखंड आधार। तर समर्थ होणार काय कसे। मायेचे कोंदट घरटे सोडूनी। मारीन गगनी भरारी मी।
कवी विंदा करंदीकरांच्या आततायी अभंगातही तुकारामांच्या अभंगांचा प्रभाव जाणवतो -
मिसिसिपीमध्ये। मिसळू दे गंगा। र्हाइनमध्ये नंगा। करो स्नान। सिंधूसाठी झरो। अमेझान घोर। कांगो बंडखोर। टेम्ससाठी।। नाईल काठी रॉकी। करो स्नान संध्या। संस्कधती अन वंध्या । नष्ट होवो।। व्होल्गाचे ते पाणी। वाहू दे गंगेत। लाभो निग्रोरेत। पांढरीला। माझा हिमाचल धरो अंतर्पट। लग्नासाठी भट वेदद्रष्टा।। रक्तारक्तातील। कोसळोत भिंती। मानवांचे अंती। एक गोत्र।
'दिंडी गेली पुढे' मधील निसर्गप्रतिमांच्या साह्याने साकार झालेला मधुकर केच्यांचा काव्यानुभव पहा-
झालो मी येथला। माडांचा सोयरा। पटली सागरा। खूण माझी।। रक्ताच्या नात्याने। उमाळली लाट। पुळणीचा काठ। ओला झालो।। अरूण कोल्हटकरांच्या 'चिरीमिरी'' मध्ये अभंग आपल्या सर्व शक्तीनिशी प्रकट होतो. वलवंत बुवा नावाच्या एका वारकर्याचे उद्गार यात वर्णन केले आहेत. विठोबासी संवाद साधताना तो म्हणतो -
''दरवर्षी हेच चालंलय। आम्ही घालतोय् खेपा।। आता येऊन पाय चेपा। पांडुरंगा।। अरे आमच्या पायांना। चालून चालून आले फोड।। आता येऊन पाय चेपा। पांडुरंगा।। अरे आमच्या पायांना। चालून चालून आले फोड।। आता घे आखडता रोड। उरला सुरला।।''
विंदा करंदीकरांनी आपल्या ''तुकोबाच्या भेटी शेक्सपियर'' या कवितेत विलियम शेक्सपियर आणि तुकाराम महाराजांची भेट घडवून आणली आहे. विंट्या म्हणजे विलियम शेक्सपियर. ''तुका म्हणजे, विट्या। तुझे कर्म थोर अवधाचि। संसार उभा केला।।
शेक्सपियर म्हणे। एक ते राहिले। तुवा जे पाहिले। विटेवरी।।
तुकारामांचां अवद्याचि संसार सुखाचा करीन हा अभंग आठवाना करंदीकरांनी हा अभंग करंदीकरांनी या दोद्यांची भेट घडवून अणून या दोघांचे सामर्थ्य सुरेख पद्धतीने अधोरेखित केले आहे.
बी- महानंदानगर, उज्जैन (म.प्र.) फोन : 0734-25113744, मो. 99770-79054
साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून