बेळगाव : विविध गावांतून 25 पासून दिंडय़ा रवाना

मंगळवार, 21 जून 2022 (07:59 IST)
महाराष्ट्रातील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दिंडी सोहळय़ांना प्रारंभ होत आहे.  बेळगाव आणि परिसरातील पायी दिंडय़ा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातून दरवषी 10 ते 15 दिंडय़ा मार्गस्थ होतात. कोरोनामुळे दिंडय़ांना ब्रेक लागला होता. यंदा सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने दिंडय़ांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
बेळगाव परिसरातून बेळगाव शहर, कसबा नंदगड, कणबर्गी, निलजी, केदनूर, आंबेवाडी, सुळगा, कंग्राळी खुर्द, सांबरा आदी ठिकाणांहून पायी दिंडय़ा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यापैकी कसबा नंदगड येथील पायी दिंडी रविवारी मार्गस्थ झाली. त्यापाठोपाठ 25 जून रोजी निलजी येथील पायी दिंडी रवाना होणार आहे. कणबर्गी, कंग्राळी खुर्द आणि आंबेवाडी येथील पायी दिंडी 28 रोजी निघणार आहे.
 
हातात पताका, डोक्मयावर कळशी घेऊन टाळमृदंगाच्या गजरात भजन-कीर्तनात तल्लीन होऊन वारकरी दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. मागील दोन वर्षात आषाढी वारीत खंड पडल्यामुळे दिंडय़ा औपचारिकरीत्या झाल्या होत्या. त्यामुळे वारकऱयांना माहेरची ओढ लागावी तशी पायी दिंडीची यंदा ओढ लागली आहे.
 
दोन वर्षात एकादशीचा सोहळा केवळ प्रतिकात्मक रूपात साजरा झाला होता. त्यामुळे वारकऱयांना विठुरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, यंदा प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन होणार असल्याने वारकऱयांना आस लागली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाव शहरासह ग्रामीण भागातून पायी दिंडय़ा मार्गस्थ होणार आहेत. या दिंडय़ांमध्ये साधारण 200 ते 250 वारकरी विठुनामाचा गजर करत रवाना होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती