कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान शंकराकडून अमरपद मिळवले. तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील, असा वर दिला होता. त्यामुळे तो ब्रम्हदेव, श्रीविष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला.
यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली.