राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे