'देता देता' गेलेला कवी

वेबदुनिया

रविवार, 14 मार्च 2010 (14:34 IST)
'विंदा'चे मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. विंदा मुळचे कोकणातले. कोकणातल्य पोंभुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री

अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी

ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. पण नंतर स्वातंत्र्यसैनिक मिळणारे वेतन मात्र त्यांनी नाकारले. विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले.

सामाजिक जाणीवा, प्रयोगशीलता आणि उत्कट प्रणय या तिन्ही बाबी त्यांच्या काव्यातून वय थकल्यानंतरही दिसत राहिल्या हा त्यांच्या टवटवीत रहाण्याचा परिणाम म्हणावा लागेल. पण या जोडीलाच त्यांचे काव्य एक नवी वैचारिक उंची सांगणारे झाले हेही महत्त्वाचे आहे. त्यांचे अष्टदर्शने काही वर्षांपूर्वीच आले.

जगभरातील अनेक तत्वज्ञांचा वैचारिक धांडोळा काव्यातून त्यांनी घेतला. त्यांच्या या प्रयत्नांची नोंद ज्ञानपीठ पुरस्कार देऊन घेण्यात आली.

कवी माधव ज्युलियन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. मर्ढेकर, मनमोहन, ब्राऊनिंग, हॉपकिन्स व एलियट या पाश्चात्य कविंनीही त्यांना प्रेरणा दिली.

इतकेच नव्हे तर राजकारणात सक्रीय नसले तरी राजकारणाचा वैचारिक वारशाचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणूनच आधी सावरकरवादी, रा.स्व.संघ यांच्याकडून मार्क्सवादाकडे त्यांचा प्रवास झाला.

विंदाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काव्यवाचनाची त्यांनी घालून दिलेली परंपरा. वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या त्रिकूटाने काव्य वाचनासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घातला. स्वेदगंगा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, मग मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका असे अनेक त्यंचे काव्यसंग्रह आहेत.

गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही

कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. समीक्षालेखनही त्यांनी बरेच केले. देता देता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला आहे.

वेबदुनिया वर वाचा