मराठी साहित्याचा आत्मा गेला

WD
प्रसिद्ध नाटककार, कथा लेखक, कलाकार अशा विविध भूमिका साकारणारे विजय तेंडूलकर यांचे आज पहाटे पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून, मराठी साहित्याचा आत्मा गेल्याचे सांगून मान्यवरांनी तेंडूलकरांना शब्दांजली अर्पण केली आहे.

मराठी नाटकांचा आत्मा गेला
अरुण साधू (प्रसिद्ध साहित्यिक)
तेंडूलकर केवळ नावासाठीच नाटक लिहित होते असे नाही, तर त्यांनी मराठी नाटकांना एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले. मराठी नाटकातील पात्र आणि व्यक्तिरेखांमध्ये जिवंतपणा ओतण्यात त्यांचा हातखंडा होता. तेंडूलकरांच्या निधनाने मराठी साहित्याचे मोठे नुकसान तर झालेच आहे. परंतु त्यांच्या जाण्याने मराठी नाटक आता पोरके झाले आहे. त्याच्या जाण्याने मराठी नाटकातील आत्माच आता निघून गेला आहे. नाटकांचा मोठा आधारस्तंभ हरपला. हा मराठी साहित्याला मोठा धक्का आहे.

विश्वास बसत नाही 'तें' गेले
दिलीप प्रभावळकर (प्रसिद्ध अभिनेते)
आज खर्‍या अर्थाने मला पोरकं झाल्यासारखं वाटतेय. तेंडूलकर हे केवळ मराठी लेखक नव्हते, तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक होते. त्यांचे जाणे अजूनही मनाला पटत नाही. आणि ते स्वीकारणे तर कठीणच आहे. त्यांनी केवळ मराठी रंगभूमीला कला आणि नाटकं दिली नाहीत, तर त्यांनी या रंगभूमीवर काम करणार्‍या कलाकारांच्या विचारांना वेगळे वळण दिले. कलाकारांची अभिरुची त्यांनी खर्‍या अर्थाने जपली. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी कलाकार आतूर असत.

एका मोठ्या पर्वाचा अंत
अमोल पालेकर ( प्रसिद्ध अभिनेते)
आज मला जेव्हा तेंडुलकर गेल्याचे कळले तेव्हा मला याचा मोठा धक्का बसला. मला विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मराठी चित्रपट ते नाटकांपर्यंत सर्वांना अगदी भरभरून दिलं. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे.

साहित्यातला संत गेला
मेधा पाटकर (सामाजिक कार्यकर्त्या)
मला त्यांना भेटायची खूप इच्छा होती. परंतु अनेक दिवसांपासून त्यांची भेट होत नव्हती. आज जेंव्हा ते गेल्याचे कळाले तेव्हा प्रथम विश्वासच बसला नाही. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातला संत हरपल्यागत वाटत आहे.

वेबदुनिया वर वाचा