मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (13:32 IST)
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रथमच नरेंद्र मोदी यांच्या गुजराती अस्मितेवर हल्लाबोल केला आहे. 
 
मोदी सरकारने घोषणा केलेल्या पहिल्या बुलेट ट्रेनवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादच का हवी, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले, असे सांगत त्यांनी भाजपच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णावर घणाघात केला.
 
पंतप्रधान अमेरिकेत गेले तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ‘केम छो’ म्हणून मोदींचे स्वागत केले. मोदी अमेरिकेला जाऊन आले, आम्हाला अभिमान वाटला, परंतु तुमचा छुपा अजेंडा काय होता, ओबामांनी मोदींचे केम छो, म्हणत स्वागत केले. त्यावेळी मोदींनी हिंदी बोलणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. याशिवाय अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्येही गरबाचे आयोजन केले होते. हे सर्व पाहता मोदी देशाचे प्रतिनिधित्व न करता गुजरातचे प्रतिनिधित्व करत आहेत काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
 
हे स्वबळ कसले ? 
 
भाजपने विधानसभेसाठी जे उमेदवार दिले, ते बहुतांशी बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे हे कसले स्वबळ आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. एवढेच नव्हे, तर मोदी यांनी गोपीनाथ मुंडे जिवंत असते, तर माझी यायची गरज नव्हती, असे सांगून त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढल्याचे सिद्ध झाले आहे. यावेळी त्यांनी अन्य पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या उमेदवारांची यादीच दाखविली. खरे तर या पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बळ दिले आहे. आता ते बेटकुळ्या काढून दाखवत आहेत, अशा शब्दातही भाजपवर टीकास्त्र सोडले.

वेबदुनिया वर वाचा