विद्यासागर राव यांना राज्यपालपदाची शपथ

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (16:41 IST)
तेलंगणा राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहिलेले चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
 
राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी राव यांना पदाची शपथ दिली. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी राव यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविली. शपथ ग्रहणानंतर राव यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
 
विद्यासागर राव यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुरेश शेट्टी, भाजपचे वरिष्ठ नेते विजय गोयल, किरीट सोमैय्या, बंडारु दत्तात्रेय, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख अनिल चोपरा व वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
गेल्याच आठवडय़ात के. शंकरनारायणन् यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
 
सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले सी. विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते सुरूवातीला केंद्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.

वेबदुनिया वर वाचा