परप्रांतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेची सत्ता आल्यास परप्रांतीयांना महाराष्ट्रात प्रवेश देणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. या भाष्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. घाटकोपर येथे ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. ज्या दिवशी आपल्या हातात महाराष्ट्राची सत्ता येईल, त्या दिवसापासून परप्रांतीयांना राज्यात प्रवेश बंदी देण्यात येईल. येथील उद्योगधंद्यात केवळ मराठी तरुण-तरुणींना रोजगार दिला जाईल अन् परराज्यातून येणार्यांना नोकरी दिली जाणार नाही. राज्यात प्रवेश करताना ट्रेनमध्येच त्याची चौकशी केली जाईल, अशा स्वरूपाचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज यांच्या भाषणाची गंभीर दखल घेत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये त्यांना बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.