प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (15:18 IST)
आम्हाला युती तोडायची नाही पण प्रत्येक गोष्‍टीला पर्याय असतो. भाजपला जागा वाढवून देणे अशक्य  आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजपसमोर प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या उत्तराची आता प्रतिक्षा असल्याचे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या तिसर्‍या टप्प्याचे सादरीकरण केले. शेतकर्‍यांना मोफत वीज  देणार अशी घोषणाही यावेळी करण्‍यात आली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने जागावाटपात  खेचाखेची करु नये. राज्यात आघाडी विरोधी वातावरण असून महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. आघाडीला  सत्तेतून खाली खेचणे हाच, महायुतीचा उद्देश असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांग‍ितले.
 
 
ज्या पक्षाचे जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉल्युला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून चालत आला  आहे. आणि त्याच वेळी युतीबाबतचा 171 आणि 117 हा फॉर्म्युला देखील ठरला होता असे उद्धव ठाकरे यांनी  सांगतले. याचा अर्थ असा की भाजपला 135 जागा द्यायची शिवसेनेची इच्छा नाही.  
 
दुसरीकडे, महायुती तोडण्याबाबत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलायचे नाही, असेही उद्धव  यांनी यावेळी स्पष्‍ट केले. शिवसेनेसोबत युती तोडा अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे मत भंडारी रविवारी  मांडले होते.  

वेबदुनिया वर वाचा