कॉंग्रेसची चाचपणी पूर्ण पण राष्‍ट्रवादीकडून दबाव कायम

बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (10:44 IST)
तोंडाव आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दबाव कायम आहे. राज्यात राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्याने आमच्या कोट्यातील 174 जागांची यादी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 114 जागांबाबतही लवकरच हायकमांड निर्णय घेतील अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी जास्तीच्या जागांच्या मागणीच्या दबावाला काँग्रेस बळी पडणार नसल्याचेही संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची बैठक मंगळवारी झाली. यापूर्वी छाननी समितीच्या तीन वेळा  बैठक चर्चा झाल्या आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या  जागावाटपाबाबत चर्चा झाली. यात राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत काही मतदारसंघांची अदलाबदल आणि काँग्रेसच्या 174  उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात विधानसभेच्या काही मतदारसंघांत उमेदवारीबाबत वाद सुरू आहेत. त्याचा निवाडा कसा करता येईल याबाबत  या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही मतदारसंघ बदलून मागितले आहेत त्याबाबत या नेत्यांनी  विचारविनिमय केला. काही विद्यमान उमेदवारांना बदलण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र,  राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या याबाबत अद्याप एकमत झालेले दिसून येत नाही. 

वेबदुनिया वर वाचा