उद्धव ठाकरेंच्या राजू शेट्टींना कानपिचक्या

बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (16:30 IST)
राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न चर्चेतून सोडवले जातील. परंतु उठबस आंदोलने करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर वा‍तावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.  
 
शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दलाल बेसुमार नफा कमावत आहेत. त्यांना पायबंद घातला पाहिजे. परंतु कायद्यात तशी तरतुद नाही. त्यामुळे केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांना सांगितले असल्याचे विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 
 
दरम्यान, कांद्याचे दर कमी झाल्याने निर्यात अनुदान द्यावे, तसेच आयात थांबवावी, या मागणीकरिता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले आहे. परंतु सारखी सारखी आंदोलन करणे योग्य नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आपण आज केंद्रात सत्तेत असून उद्या राज्यातही सत्तेत येऊ. परंतु चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजेत. प्रश्न चर्चेतून सुटले नाहीत तर आंदोलने खुशाल करा, असेही ठाकरे यावेळी म्हटले. 

वेबदुनिया वर वाचा