Propose Day 2025 : प्रपोज करण्याचे गोल्डन रूल्स

शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 (07:34 IST)
प्रपोज करण्याचे गोल्डन रूल्स
वेलेन्टाइन आठवड्यातील दुसरा दिवस प्रपोज डे चा आहे.रोज डे वर आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी  म्हणजे प्रपोज डे च्या दिवशी आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या समोर आपले त्यांच्या वर  प्रेम असल्याची कबुली दिल्यावर आपण पुढे पाऊल टाकू शकता. वेलेन्टाइन आठवड्याचा दुसरा दिवस खास असतो जेव्हा लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. आपल्या प्रेमाच्या भावना त्यांना सांगतात.
ALSO READ: Propose Day 2025: प्रपोज करण्यासाठी हे उपाय अवलंबवा
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघतांय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थाबंली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हाअतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा. म्हणूनच 'प्रपोज करण्याच्या गोल्डन रूल्स'चा 'सिलॅबस' पूर्ण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 
ALSO READ: Propose Day Special प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतातील हे 5 उत्तम ठिकाण
नियम 1
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
जमाना बदलला असला तरी आपल्याला आपली संस्कृती व परंपरा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचा सन्मान करावाच लागेल. आई-बाबांशी या विषयी चर्चा करून झाल्यावर तुम्ही ज्या कुणाला प्रपोज करणार आहात तिच्या घरच्या मंडळीशी बोला. त्यानंतरच तिच्यासमोर प्रस्ताव ठेवा.
 
नियम 2
हृदयातून संवाद साधा
तिला प्रपोज करताना तुमच्या आवाजात गोडवा पाहिजे. तुमचे मधुर शब्द, वाक्ये तिच्या हृदयाला स्पर्श करणारी असावीत. तिच्याशी संवाद साधताना आत्मस्तुतीला बळी पडू नका. तुम्हाला ज्या काय भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या कमी व अर्थपूर्ण शब्दात सांगा. तुमचे वक्तव्य हे थोडक्यात पण महत्त्वाचे असे असले पाहिजे. कारण तुमच्या भावना तिच्यापर्यंत सहज व 'लव'कर पोहचतील. 
 
नियम 3
'क्रिएटिव्ह' व्हा
'प्रेम' जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. परंतु, त्या फुलाचा सुगंध 'लव'करच संबधित व्यक्तीपर्यंत पोहचला पाहिजे. 'प्रपोज' करण्याची संधी आयुष्यात (कदाचित) एकदाच येते. त्यासाठी 'रोमँटिक' व्हा, 'क्रिएटिव्ह' व्हा... तो क्षण तिच्या व तुमच्या आयुष्याला अविस्मरणीय झाला पाहिजे अशी योजना करा. त्यासाठी तुम्ही आधी कुठे भेटला होता, त्या स्थळी अथवा एखाद्या रम्य अशा कातरवेळी 'लव्ह'पॉंईंटवर तुमच्या अबोध मनाच्या कप्प्यात तिच्या विषयी लपलेल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करा. 
ALSO READ: Propose Day 2025 Wishes प्रपोझ डे शुभेच्छा
नियम 4
पूर्वतयारी महत्त्वाची
पूर्वतयारी करत असताना करंगळीचे माप माहीत नाही? चिंता नाही. तेच माहीत करून घेण्यासाठी नाजून 'फॅशनेबल रिंग' घेऊन जायला विसरू नका. तिला आवडेल अशा पद्धतीने सजून जा. तिला आवडणारे कॉम्बीनेशन लक्षात घ्या. परिधान केलेला ड्रेस तुमचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव यांची ओळख करून देतो हे विसरू नका. 
 
नियम 5
'ते' क्षण कॅमेर्‍यात टिपा
ती आणि तुम्ही एका रम्य सायंकाळी नदीच्या काठावर अथवा आवडणार्‍या स्थळी आहात. त्याचवेळी तुमच्या मनातील तिच्या विषयीच्या भावनांना शब्दरूप देऊन झाल्यानंतर तिचा होकार मिळताच एकदम बावरून जाऊ नका. तुमच्या मोबाईलमधील कॅमेर्‍यात तिची प्रत्येक अदा टिपा. व्यक्तीच्या आयुष्यात ही एकदाच घडणारी घटना असल्याने त्या घटनेला आयुष्यभरासाठी सजवून ठेवा. जीवनाच्या प्रवासात छायाचित्र निहाळून 'त्या' गुलाबी क्षणाला अधूनमधून उजाळा देता येऊ शकतो. 
 
नियम 6
लॉंग ड्राईव्ह
तिने शहराबाहेर निवांत अशा वातावरणात जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर शहरापासून साधारण 15 ते 20 किमी अंतरावरच्या प्रेक्षणीय स्थळी, निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तिला प्रपोज करू शकता. 
 
पहिल्या नियमात घरातील ज्येष्ठांची अनुमतीची प्रक्रिया तुम्ही यशस्वीरित्या पार केली म्हणजे तुमचे 50 टक्के काम झाले समजा. मात्र तिच्या होकाराशिवाय तुमची डाळ कुठेच शिजत नाही. तुम्ही तिला आत्मविश्वासाने प्रपोज केले तरी तुमचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी तिच्याकडे अनेक कारणं असू शकतात किंवा तिच्या काही अडचणी तुमच्यात आडव्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आल्या पावली मागे जावे लागते. 'ब्रेकअप'नंतर हताश होऊ नका किंवा तिला त्रास होईल, असे वक्तव्य करू नका. एकाकीपणाला सामोरे जाण्यासाठी या काही टिप्स तुमच्या सोबतच राहतील....
 
'देवदास' न होण्यासाठी....
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका.
हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये.
दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे. त्यावर आत्मपरिक्षण करा.
अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते.
तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून जा.
अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती