सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर हे करिअर म्हणून प्रत्यक्षात नेमकं कसं आहे? जाणून घ्या
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (22:48 IST)
फोन हातात घेताच लोक सहसा बातम्या वाचण्याबरोबरच सोशल मीडियावरील व्हीडिओ पाहू लागतात. यानंतर, काही मिनिटांचे तासांत केव्हा रूपांतर होतं ते कळतही नाही.
हे व्हीडिओ बनवणारे कंटेंट क्रिएटर्स (विविध प्रकारचा लिखित, ऑडिओ, व्हीडिओ मजकूर) आजकाल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
हे कंटेंट क्रिएटर्स इन्फ्लूएन्सर (प्रभावक) म्हणून स्वत:चे व्यवसाय देखील चालवत आहेत. पण तरीही त्याच्याकडे 'नोकरी' म्हणून पाहिले जात नाही.
फराह शेख एक व्यावसायिक कंटेंट क्रिएटर आहे.
गेल्या सहा वर्षांपासून त्या या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत.
पण आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना करिअरचा हा पर्याय मान्य नाही.
“माझा दिवस घरातील कामाने सुरू होतो. माझ्या मुलीला शाळेत पाठवल्यानंतर मी स्वतःला थोडा वेळ देते. यानंतर मी 11 वाजता माझे व्यावसायिक काम सुरू करते.
सर्वप्रथम, एक टीम मीटिंग असते ज्यामध्ये आम्ही विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) करतो म्हणजेच भविष्यातील रणनीतीवर सखोल चर्चा होते. या बैठकीला फायनान्सपासून ते व्हीडिओ टीममधील सर्वजण उपस्थित असतात. सकाळची वेळ आमच्या कामासाठी आणि पुढील नियोजनासाठी असते."
“मी आठवड्यातून साधारणपणे 35 ते 40 तास काम करते. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा व्हीडिओ फक्त एक किंवा दोन मिनिटांचा असतो. पण तो बनवण्यासाठी अनेक लोकांची मेहनत आणि काही तास लागतात.
सुदैवाने आता माझ्यासाठी वेगवेगळी कामं करणारी एक टीम आहे, परंतु सुरुवातीला सर्व कामं मी एकटीच करायचे." असं फराह शेख यांचं म्हणणं आहे.
पण इतर काम करणाऱ्या लोकांप्रमाणे आठवड्यातून 35-40 तास काम करूनही लोक कंटेंट निर्मितीकडे खरं काम म्हणून किंवा नोकरी म्हणून पाहत नाहीत.
याचं कारण काय?
सगळे विचारतात तुम्ही काय काम करता?
कंटेंट क्रिएशनमध्ये येण्यापूर्वी फराह कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होत्या. त्यावेळी त्या अनेक ब्रँड्ससाठी डिजिटल मार्केटिंगचं काम पाहत असत.
कंटेंट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी कुटुंबाला सांगितला त्या क्षणाची त्यांना आठवण होते.
त्या सांगतात, “त्या दिवसांत मी गरोदर होते. कंटेंट निर्मिती क्षेत्रात जाण्याची इच्छा मी माझ्या पालकांकडे व्यक्त केली. त्यांना वाटले की ठीक आहे, ती हे करेल आणि मग जर तिला यात आनंद वाटला नाही तर ती कंटाळेल आणि दुसरे काहीतरी करू लागेल."
त्या सांगतात, 'फक्त घरातील लोकच नाही तर आजूबाजूचे लोकही याकडे छंद म्हणून बघायचे. लोक विचारायचे, तुम्ही हे करताय हे चांगलं आहे, पण तुम्ही नोकरी कुठे करता?"
फराह म्हणतात, “मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा लोकांना वाटलं नव्हतं की हे एखाद्याचं पूर्णवेळ काम असू शकतं. लोकांना वाटायचं, चांगलं आहे – यातूनही पैसे मिळतात. जेव्हा टिक टॉक होतं तेव्हा लोकांना वाटायचं, अरे देवा! नाचून पैसे कमावताय का?"
पण आता लोकांची मानसिकता बदलत असून ते याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
फराह यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर सध्या त्यांच्याकडे अनेक ब्रँड आहेत ज्यांच्यासाठी त्या जाहिराती करतात.
त्यांच्यामते आता हळूहळू लोकांची विचारसरणी बदलत आहे.
त्या सांगतात, "पूर्वी त्यांना वाटायचं की फक्त एका मिनिटाचाच व्हीडिओ आहे, त्यात मोठी गोष्ट काय आहे. मात्र या कामासाठी किती मेहनत लागते हे आता लोकांना समजू लागलं आहे."
अनेक वर्षं लोकांचा असा गैरसमज होता की हे काम करणाऱ्यांमध्ये तरुण महिलांची संख्या जास्त आहे.
काही लोक याकडे प्रतिष्ठित काम म्हणूनही पाहत नसंत. पण आता लोकांच्या मतांसोबतच या व्यवसायात कार्यरत लोकांची कार्यशैलीही बदलत आहे.
इन्फ्लूएन्सिंगचं मार्केट वाढण्याची शक्यता
इन्फ्लूएन्सर्स डॉट इन वर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत इन्फ्लूएन्सिंगचं मार्केट 25 टक्के दराने वाढू शकतं.
2025 पर्यंत ही बाजारपेठ 2,200 कोटी रुपयांचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा आहे.
अहवालात असंही म्हटलं आहे की, 62.2 टक्के ब्रँड इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंगवर विश्वास ठेवतात.
या ब्रँडना हे चांगलं ठाऊक आहे की, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर्स हे महत्त्वाचा दुवा आहेत.
मोठ्या कंपन्यांसाठी हे मार्केट त्यांच्या डिजिटल मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असतं, तर छोट्या संस्थांना देखील इन्फ्लूएन्सर्सचं महत्त्व समजलंय परंतु ते सध्या मार्केटिंगच्या या प्रकारावर म्हणावा तितका खर्च करत नाहीएत.
फराह सांगतात, “फक्त लोकांचा दृष्टिकोनच बदलला नाहीए, तर ब्रँड्सही खूप व्यावसायिक झाले आहेत. मार्केटिंगच्या या स्ट्रॅटेजीवर ब्रँड्सनेसुद्धा चांगल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. असंही मार्केटिंगच्या जुन्या माध्यमांच्या तुलनेत इन्फ्लूएन्सर मार्केटिंग खूपच स्वस्त आहे आणि ब्रँडची विक्री देखील चांगली होत आहे.
करिअरसाठी हा एक चांगला पर्याय आहे का?
डिजिटल रणनितीकार (स्ट्रॅटेजिस्ट) आणि लाइफ कोच देबराती रिया चक्रवर्ती यांचा असा विश्वास आहे की या व्यवसायाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.
त्या म्हणतात, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर कंटेंट निर्मात्यांना स्वत:चा कंटेंट तयार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. लोकांना देखील हे इन्फ्लूएन्सर जवळचे वाटतात."
यासोबतच त्यांचा असं वाटतं की, 'आता इन्फ्लूएन्सर्सच्या एजन्सी देखील सुधारत आहेत. यापूर्वी ते केवळ ब्रँड्सना निर्मात्यांशी जोडण्याचं काम करत होते. मात्र आता ते सर्व प्रकारच्या सेवा देत आहेत आणि ब्रँड आणि इन्फ्लूएन्सर्स यांच्यातील महत्त्वाचा दुवा झाले आहेत.
'द मोबाइल इंडिया'चे संपादक, संस्थापक आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ संदीप बुडकी यांचा असा विश्वास आहे की सध्या इन्फ्लूएन्सर्स या क्षेत्राकडे करिअर म्हणून न पाहता व्यावसायिकदृष्टीने पाहत आहेत.
ते म्हणतात, "या दोन पद्धतींमध्ये फरक एवढाच आहे की जर त्याच्याकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिलं तर ती व्यक्ती त्याच्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आणि ते कसे करावे इत्यादीकडेही लक्ष देते.
त्यांना वाटतं की मी असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे माझं नावही खराब होणार नाही आणि जे मी दीर्घकाळ या क्षेत्रात काहीतरी करू शकेन. करिअरमध्ये ही भावना नसते, असं मला इथं दिसतं.”
इन्फ्लूएन्सर मार्केटिंगचे फायदे
ब्रँड्स विविध मार्गांनी इन्फ्लूएन्सर मार्केटिंगचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.
उदाहरणार्थ, फॅशन आणि सौंदर्य ब्रँड्स हे फॅशन ब्लॉगर्स आणि इन्फ्लूएन्सर्ससोबत हातमिळवणी करत आहेत.
ट्रॅव्हल ब्रँड्स त्यांची विक्री वाढवण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉगर्ससोबत हातमिळवणी करत आहेत, तर फूड ब्रँड्स फूड ब्लॉगर्सचा वापर करून घेत आहेत.
ब्रँड्ससाठी इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंगचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ते विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकांना टार्गेट करू शकतात.
ब्रँड्स त्या इन्फ्लूएन्सर्सची निवड करू शकतात जे त्यांना अपेक्षित ग्राहकांसाठी कंटेंट बनवून देऊ शकतात.
देबाराती रिया चक्रवर्ती म्हणतात, "कंटेंट निर्मात्यांकडून जाहिराती बनवून घेण्यासाठी बाजारात भरपूर वाव आहे. ब्रँड देखील टीव्ही किंवा वर्तमानपत्रांवर जाहिरात करण्याऐवजी इन्फ्लूएन्सर मार्केटिंगवर जास्त विश्वास ठेवतायत.
जेव्हा एखादी कंपनी त्यांची जाहिरात करण्यासाठी इन्फ्लूएन्सर एजन्सीशी संपर्क साधते तेव्हा इन्फ्लूएन्सर्सचे किती फॉलोअर्स आहेत, असा सवाल कंपनीकडून विचारला जातो.
फॉलोअर्स नैसर्गिकरित्या जोडलेले आहेत की नाही? त्यांनी कोणत्या ब्रँडसोबत काम केले आहे? या क्षेत्रात 5 वर्षं किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांपासून ते 80 वर्षं वयाचे लोक या क्षेत्रात काम करत आहेत.
संदीप बुडकी सांगतात, "मार्केटिंगच्या जगात दर दहा वर्षांनी एक नवीन ट्रेंड येतो. पूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात आल्या नाहीत, तर त्या जाहिराती वाटत नसत.
नंतर रेडिओवर जाहिराती येऊ लागल्या आणि आता कंपन्या विशेष प्रकारच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी इन्फ्लूएन्सर्सची मदत घेतात."
"प्रत्येक ब्रँडची स्वतःची एक श्रेणी असते. असे काही इन्फ्लूएन्सर्स असतात ज्यांचे पाच किंवा सहा हजार फॉलोअर्स असतात, पण काहीवेळा तेसुद्धा कामाला येतात आणि काही इन्फ्लूएन्सर्स असे आहेत ज्यांचे लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स असतात.
त्यामुळे सर्वकाही ब्रँड आणि इन्फ्लूएन्सर्सच्या प्रकारावर अवलंबून असतं की त्यांचे लक्ष्य कुठले प्रेक्षक आहेत. टार्गेट ऑडियन्सचा हा संपूर्ण खेळ आहे."
संदीप असंही सांगतात, "जुन्या पिढीची खरेदीची पद्धत अजूनही 'वर्ड ऑफ माउथ' आणि 'व्हॅल्यू फॉर मनी' अशीच आहे आणि यामागचं विश्लेषण ते स्वतः करतात.
त्याचवेळी, तरुण प्रेक्षकांना वाटते की या व्यक्तीचे खूप चांगले फॉलोअर्स आहेत, यांना बराच अनुभव आहे म्हणूनच ते या सर्व गोष्टी लोकांना सांगत आहेत."
कोणत्या गोष्टी बदलणे आवश्यक आहे?
या व्यवसायात काय सुधारणा करता येतील यावर देबराती रिया चक्रबती म्हणतात की, सध्या अनेक लोकांना असं वाटतं की इन्फ्लूएन्सर्सचे काम हे गंभीर काम नाहीए.
हे माध्यम अतिशय कॅज्युअल आहे. त्यामुळे अनेकदा लोकांचा गैरसमज होतो.
या व्यवसायात अनेक गोष्टी आहेत ज्या बदलण्याची आवश्यक आहे. कारण इथे मानधनाची एकसमान पद्धत नाही. एजन्सी यामधील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या व्यवसायात अनिश्चितता असल्याचंही फराह कबूल करतात, “काही महिने हातात खूप काम असतं तर काही महिने काहीच काम नसतं. पण ही परिस्थिती थोड्याफार फरकाने अनेक क्षेत्रांमध्ये पाहायला मिळते.
पण गेल्या काही वर्षांत ज्याप्रकारे इन्फ्लूएन्सिंग क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत ते पाहून फरहा म्हणतात, "मला भविष्यात माझं काम करायला नक्कीच आवडेल आणि मी ऑनलाइनच काम करेन हे ठरलेलं आहे.