आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी इंटरनेट उपलब्ध नसलेल्या प्रदेशात ई-रुपयाचा वापर करण्यावर भर दिला आहे. या भागात लवकरच डिजिटल रुपयात व्यवहार करता येतील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा पथदर्शी प्रकल्पात ऑफलाईन डिजिटल रुपयाचा वापर करता येईल.
पथदर्शी प्रकल्प पथ्यावर
शक्तिकांत दास यांनी ई-रुपयाच्या वापरासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार, सध्या हा पथदर्शी प्रकल्प आहे. डिसेंबर २०२२ मध्ये सामान्य व्यवहारासाठी त्याचा वापर सुरु झाला. हा पथदर्शी प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये एका दिवसात १० लाखांच्या व्यवहाराचे उद्दिष्ट गाठण्यात आले. युनिफाईट पेमेंट इंटरफेस शिवाय इतर अनेक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म ऑफलाईन पेमेंटची सुविधा देतात.
सध्या असा होतो वापर
सध्याच्या पथदर्शी प्रकल्पात बँका डिजिटल रुपया वॉलेटचा वापर करुन व्यक्ती ते व्यक्ती (पी2पी) आणि व्यक्ती ते व्यापारी (पी2एम) असा व्यवहार करता येतो. ऑफलाईन पेमेंट झाल्यावर ई-रुपयाच्या वापरात मोठी वाढ दिसून येईल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच अनेक सेवांसाठी ई-रुपयांचा वापर वाढेल. पण ऑफलाईन सेवेचा वापर कसा होईल, हे अद्याप समोर आले नाही. येत्या काही दिवसात याविषयीची माहिती समोर येईल.