अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

सोमवार, 22 एप्रिल 2024 (11:33 IST)
निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.
 
राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे रोजी  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे..
 
त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील.

यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
 
मतदार यादीत नाव कसे तपासावे
voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा
 
वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.
 
मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा
अर्ज क्र. ६ – नवमतदार नोंदणी
ऑनलाइन पद्धतीने – voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा
 
ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx
 
मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.
 
मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड,  राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,  नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.
 
voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.
 
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांचे दुवे :
फेसबूक: https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra
युट्यूब: https://www.youtube.com/@ceomaharashtra211
इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/ceo_maharashtra/
एक्स (ट्विटर): https://twitter.com/CEO_Maharashtra

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

Edited By- Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती