चिखलफेकीचे 'काळे' राजकारण

मंगळवार, 4 नोव्हेंबर 2008 (17:31 IST)
WDWD
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यंदा अधिक चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या निवडणुकीची पार्श्वभूमी यंदा जरा वेगळी आहे. एकीकडे चीन महासत्ता म्हणून उदयास येत आहे, तर दुसरीकडे अमेरिका नावाची विद्यमान महासत्ता अस्तित्वाचा लढा देताना दिसत आहे.

इराक, तालिबान, अफगाणिस्तान या तीन युद्धांमुळे अमेरिका आता पुरती थकली आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेचेही आता धिंडवडे निघाले आहेत. महासत्ता बनण्याच्या नादात अतिमहत्वाकांक्षी हिटलरामुळे महायुद्ध झाले, यात अनेक देशांचे अस्तित्वच नष्ट झाले. नेक देश आजही पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी झगडत आहेत.

अशीच काहीशी अवस्था आज अमेरिकेची झाली आहे. युद्धाच्या नादात अमेरिकेचे, नेत्यांचे आणि मंत्र्यांचे अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने आज अमेरिकी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष काहीतरी करून दाखवेल अशी आशा येथील जनतेला आहे. याच कारणाने यंदा अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अत्यंत संवेदनशील झाल्या आहेत.

आपल्या नव्या राष्ट्राध्यक्षांकडून अनेक अपेक्षा असल्याने अमेरिकी जनतेसाठीही ही निवडणुक महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेतील पक्षांनीही ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने भारताप्रमानेच या निवडणुकांमध्ये अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप प्रत्यारोप झाले. निवडणुका म्हटलं की एकमेकांवर चिखलफेक ही आलीच. याला अपवाद कोणताही देश उरलेला नाही. किंबहुना यशस्वी राजकारणाचे हे एक सूत्रच बनले आहे.

अमेरिकीजनांसाठी ही निवडणुक आणखी एका दृष्टिकोनातून जरा वेगळी आहे. यंदा प्रथमच गोर्‍यांच्या 'व्हाईट हाऊस'साठी एक कृष्णवर्णीय अर्थात काळ्या चामडीचा माणूस लढा देत आहे. अमेरिकी लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. परंतु, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका कृष्णवर्णीय माणसाला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढण्याची संधी मिळाली यात काय ते आले.

अमेरिकेत प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन हा आपला गैरसमज आहे. अमेरिकेत भारताप्रमाणेच अनेक पक्ष आहेत, परंतु प्रभावी असे हे दोनच पक्ष आहेत. त्यामुळे नेहमी या दोन पक्षांमधूनच राष्ट्राध्यक्ष निवडून येतो.

यंदा बराक ओबामा यांना डेमोक्रेटिक पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली. मुळात त्यासाठी त्यांना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करावा लागला. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली. आता त्यांची लढत होतेय, रिपब्लिकन जॉन मॅक्केन यांच्याशी. मॅक्कन आणि ओबामा यांच्यात काट्याची टक्कर आहे.
WDWD

या चुरशीच्या निवडणुकीमुळेच यावेळी प्रचारही तितकाच चुरशीचा झाला. त्यासाठी अगदी खालची पातळीही गाठण्यात आली. मोठी लोकशाही असलेल्या आणि इतरांना मतभेद मिटवण्याचे धडे देणार्‍या अमेरिकेच्या राजकारणात एका कृष्णवर्णीय माणसावर होणारे आरोप किती खालच्या पातळीवरील असू शकतात? ओबामांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर त्यांना वेळोवेळी त्यांना कृष्णवर्णीय म्हणून हिणवण्यात आले.

अनेक सभांमधून रिपब्लिकन पक्षाने ओबामांचा रंग कोणता हे सांगण्यावरच हजारो डॉलर खर्च केले. यातून ओबामांनी मार्ग काढत आपला प्रचार सुरूच ठेवला. रिपब्लिकनचा हा प्रचार फुस्स झाल्यानंतर ओबामांचा धर्म कोणता यावर चर्चेचे गुर्‍हाळ घातले गेले. त्याचा प्रचार करणारी पोस्टर्स न्यूयॉर्कपासून ते कॅलिर्फोनियापर्यंत लावली. त्यावर बराक हुसेन ओबामा असा मुस्लिम निदर्शक नावाने ओबामांचा उल्लेख करण्यात आला होता. मॅक्केन यांनी आपल्या अनेक सभांमधून ओबामांचा उल्लेख त्यांच्या पूर्णं नावानेच केला.

ओबामा हे मुस्लिम असल्याचा खोटा प्रचार करण्याचा होता. परंतु ओबामा हे ख्रिश्चन असल्याने त्यांना याही आरोपाला तोंड देण्यासाठी आपली शक्ती खर्च करावी लागली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेत मुस्लिम समाजाविषयी द्वेष निर्माण झाला आहे. ओबामांना मुस्लिम ठरवत त्यांचा मागे टाकण्याचे षडयंत्र रचले होते. परंतु, ओबामा यातूनही सहीसलामत सुटले.

यानंतर रिपब्लिकन पक्षाने त्यांच्या आत्यावरून अमेरिकेत वादळ माजवले. ओबामांच्या आत्या ( नातेवाईक) अमेरिकेत बेकायदा राहतात, आणि ओबामांचा त्यांना पाठिंबा असल्याचा प्रचार करण्यात आला. यावेळी ओबामांना सफाई द्यावी लागली.

अखेरचा पर्याय म्हणून ओबामांवर दहशतवाद्यांची मदत केल्याचा आणि त्यांच्याशी ओबामांचे संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला. ओबामांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांना अमेरिकेत कधीकाळी हल्ले करणार्‍या एका दहशतवाद्याने मदत केल्याचा कांगावा रिपब्लिकन पक्षाने केला. परंतु, यानंतरही ओबामांना देशातील इलेक्ट्रलचा ( अमेरिकेतील निवडणुक प्रक्रियेत यांना महत्त्व असते, ज्या पक्षाचे 270 इलेक्ट्रल निवडून येतात त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष निवडून येतो.) चांगलाच पाठिंबा आहे. परंतु, या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत अमेरिकेचे राजकारण मात्र चिखलात रंगले हे मात्र निश्चित.