ओबामांचा अमेरिकी प्रवास..

4 ऑगस्ट 1961 साली होनूलूलू येथे जन्माला आलेल्या बराक ओबामांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक लढे दिले. त्यांच्या विचारांवर गांधीजींचा प्रभाव असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

त्यांच्या प्रचार कार्यालयात गांधीजींचा फोटो लावण्यात आला आहे. ओबामांनी दिलेला लढ आणि त्यांचा जीवन प्रवास कसा झाला त्याविषयी....
1960 साली बराक ओबामांचे वडील केनियातून अर्थशास्त्रविषयक अभ्यासासाठी अमेरिकेत आले होते.

युनिर्व्हसीटी ऑफ हवाई येथे त्यांची ओळख एना डुनहेम यांच्याशी झाली. त्यांनी याचवर्षी एनाशी लग्न केले. आणि त्यांना 61मध्ये पुत्ररत्न झाला तेच बराक ओबामा.

1963 साली एना आणि ओबामांच्या वडिलांमध्ये मतभेद निर्माण झाले, याचा परिणाम दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ओबामा केवळ दोन वर्षांचे होते. यानंतर एना यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला, आणि त्या इंडोनेशियात गेल्या. तिथे त्या चार वर्षे होत्या.

साधारण 70च्या दशकात ओबामा पुन्हा आपल्या आजोबांकडे हवाईत परतले. 1983 साली राजकारण विषयात डिग्री मिळवल्यानंतर ओबामांनी बिझनेस इंटरनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी सुरू केली. ही ओबामांची पहिली नोकरी होती. ओबामांचे मन येथे फारसे रमले नाही. ते ही नोकरी सोडून 1985 साली शिकागोत गेले. तेथे एका स्वयंसेवी संस्थेत त्यांनी नोकरी केली.

ओबामांना जसा राजकारणात रस होता तसेच त्यांना कायदेविषयक ज्ञान मिळवण्याची लालसा होती, म्हणून त्यांनी 87साली हावर्ड लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

इथूनच ओबामांचा राजकारण प्रवास सुरू होतो. या काळात त्यांनी लॉ रिव्ह्यूची निवडणुक लढवली आणि ते याचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.

1991 साली त्यांनी शिक्षण पूर्णं केल्यानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. 18 ऑक्टोबर 1992 साली त्यांनी मिशेल रॉबिन्सन यांच्याशी विवाह केला.

1996 साली ते इलियानाईट स्टेटसाठी सिनेटवर निवडून आले. यानंतर त्यांनी 2000 साली यू एस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु 2004मध्ये त्यांना यात यश आले आणि ते 52 टक्के मतांसह डेमोक्रेटीक नॅमिनेशन मिळवते झाले.

2006 साली ओबामांना आपल्या 'स्पोकन वर्ल्ड अल्बम ड्रीम्स ऑफ माय फादर' यासाठी ग्रॅमी ऑवॉर्ड मिळाला.10 फेब्रुवारी 2007 साली राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुक लढवण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केली.

वेबदुनिया वर वाचा