छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन भाजपला तेलंगणा जिंकायचं आहे का?

- विनीत खरे
छत्तीसगड, मिझोराम, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा मानली जात आहे.
 
या पाच राज्यांपैकी तीन राज्यात भाजपची लढत थेट काँग्रेस बरोबर आहे. मिझोराम आणि तेलंगणा या दोन राज्यात स्थानिक पक्षांमध्येच स्पर्धा आहे.
 
119 विधानसभेच्या जागा आणि 17 लोकसभेच्या जागा असलेल्या तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेस समोर सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीचं (बीआरएस) आव्हान आहे. 10 वर्षांपूर्वी तेलंगणाची स्थापना झाली.
 
बीआरएसला पक्का विश्वास आहे की, शेतकरी आणि समाजाच्या विविध घटकांसाठी काम करणाऱ्या त्यांच्या सरकारी योजनांमुळे त्यांना निवडणुकीत नक्कीच विजय मिळेल.
 
भाजपसाठी तेलंगणाचे निकाल महत्त्वाचे आहेत.
 
काही तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात भाजपने आपलं शिखर गाठलंय आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणच्या जागांचं संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी पक्षाला त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेर पकड मजबूत करणे आवश्यक आहे.
 
भाजपला तेलंगणाकडूनही अपेक्षा आहेत कारण 2019 मध्ये, पक्षाने तेलंगणातील लोकसभेच्या चार जागा 20 टक्क्यांच्या फरकाने जिंकून अनेक विश्लेषकांना आश्चर्यचकित केलं होतं.
 
2020 मध्ये हैद्राबादच्या स्थानिक निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर भाजपच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.
 
पण भाजपने पाच वर्षांपूर्वी विधानसभेत टी राजा सिंह यांच्या रूपाने केवळ एक जागा जिंकली. त्यावेळी पक्षाची मतांची टक्केवारी केवळ 7.1 टक्के इतकीच होती.
 
काँग्रेस आणि ओवेसी
कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर काँग्रेसला जाती आधारित जनगणना, महिला, शेतकरी आणि वृद्धांना लाभ देणाऱ्या योजना, अशी सहा आश्वासन देऊन विजय मिळवण्याची आशा आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, भाजप नेते आपल्या भाषणातून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारी बीआरएस आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन एकत्र असल्याचा आरोप होतोय.
 
बीआरएस आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन मध्ये कोणतीही औपचारिक युती झालेली नाही, पण असदुद्दीन ओवेसी बीआरएसच्या धोरणांचं कौतुक करताना दिसले. शिवाय त्यांनी मुस्लिमांना बीआरएसला मत देण्यास सांगितलं आहे.
 
यामागचं नेमकं कारण काय हे समजणं कठीण आहे. अनेक हिंदुत्व समर्थक ओवेसी यांच्यावर टीका करत आहेत.
 
निवडणुकीपूर्वी रझाकार चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तसेच मागच्या वर्षी कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे निलंबित झालेले भाजप आमदार राजा सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. या घटनांकडे भाजप तेलंगणात हिंदुत्वाचा प्रचार करत असल्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय.
 
राजा सिंह यांना तेलंगणात हिंदुत्वाचा पोस्टर बॉय असं म्हटलं जातं.
 
तेलंगणातील भाजपचे माजी प्रमुख आणि हिंदुत्वाचा चेहरा मानले जाणारे बंडी संजय कुमार यांनी मे महिन्यात एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, "आज हिंदुत्व नसतं तर देश कोसळला असता. त्याची अवस्था पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान सारखी असती. हिंदुत्व नसते तर भारतच अस्तित्वात नसता. त्यामुळे तेलंगणात रामराज्य आणणं हे उद्दिष्ट आहे."
 
शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हिंदुत्व
हिंदूंना संघटित करण्याच्या उद्देशाने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे टीकाकार करत आहेत.
 
मुघल साम्राज्याचा सहावा शासक औरंगजेब हा त्याच्या काळातील सर्वात शक्तिशाली शासक होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारल्याची कथा सर्वश्रुत आहे.
 
भाजप आणि हिंदू संघटनांवर तेलंगणातच असे आरोप केले जात आहेत.
 
तेलंगणातील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र यासंदर्भात नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.
 
भाजप नेते बंडी संजय कुमार फेब्रुवारीत म्हणाले होते की, तेलंगणातील सर्व गावांमध्ये महाराजांचे पुतळे बसवण्यात येतील. त्यांच्या या विधानाकडे टीकाकारांनी लक्ष वेधलं आहे. ते म्हणाले होते, "हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले आहेत. जे नेते हिंदू धर्मासाठी काम करतात अशाच नेत्यांना प्रत्येक गावातील लोकांनी मतदान करावं."
 
छ. शिवाजी महाराजांचा वारसा
फुले-आंबेडकर सेंटर फॉर फिलॉसॉफिकल अँड इंग्लिश ट्रेनिंग, हैदराबाद येथे राज्यशास्त्र शिकवणारे फुले-आंबेडकर रिसर्च स्कॉलर आणि प्राध्यापक पी. मणिकंटा यांच्या मते, बंडी संजय कुमार यांचं शिवाजी महाराजांबद्दलचं विधान महत्त्वाचं आहे. त्यांना (हिंदू संघटनांनी) सर्व हिंदूंना संदेश देण्यासाठी शिवाजी महाराजांचं प्रतीक सापडलं आहे.
 
भाजप आमदार राजा सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तेलंगणात शिवाजी महाराजांच्या "300 हून अधिक पुतळ्यांचे" उद्घाटन केले आहे.
 
त्यांच्या हैदराबाद येथील कार्यालयात शिवरायांचे पुतळे आहेत.
 
राजा सिंह यांच्या मते, "शिवाजी महाराज हिंदूंसाठी देवतेसमान आहेत."
 
ते म्हणतात, "आम्ही 2010 मध्ये याची सुरुवात केली होती. आमचा उद्देश एवढाच होता की प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बनले पाहिजे. ते केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही राजे होते."
 
छ. शिवाजी महाराजांची कर्मभूमी महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी असली तरी डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक शिवाजी महाराजांच्या गोवळकोंडा किल्ल्याशी असलेल्या संबंधांची आठवण करून देतात.
 
1677 मध्ये, शिवाजी महाराजांनी जुलमी औरंगजेबाविरोधात लष्करी युती करण्यासाठी गोवळकोंड्याचा कुतुबशाही राजा अबुल हसन तानाशाहची भेट घेतली होती.
 
पुतळे बसवण्यावरून वाद
शिवाजी महाराजांच्या धार्मिक वर्तन आणि विचारांबाबत गोविंद पानसरे यांनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकात लिहिलंय की, "शिवाजी महाराजांचा धर्मावर विश्वास नव्हता. ते धर्मनिरपेक्ष होते किंवा त्यांनी आपले राज्य धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले होते."
 
"ते इस्लामच्या विरोधात होते का? त्यांचा हिंदू धर्मावर विश्वास होता, म्हणजे ते मुस्लिम धर्माचा द्वेष करत होते का? त्यांना मुस्लिमांना हिंदू करायचं होतं की त्यांचं महाराष्ट्रीकरण करायचं होतं?" या सर्व प्रश्नांचं उत्तर 'नाही' असं आहे.
 
आम्ही महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहराला भेट दिली. मागच्या वर्षी मार्चमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून इथे हिंसाचार उसळला होता.
 
आंदोलक आणि पोलिसांव्यतिरिक्त शिवसेनेच्या शिंदे गटाचे गोपीकिशन पसपुलेटी हेही त्यावेळच्या मोबाईल व्हीडिओमध्ये दिसत आहेत.
 
गोपी किशन सांगतात, शहरातील आंबेडकर चौकात त्यांना बराच काळापासून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता. पण हे प्रकरण गुंतागुंतीमध्ये अडकलं होतं. शेवटी एक दिवस पहाटे त्यांनी काही लोकांसह चौकात पुतळा बसवला.
 
काही वेळातच या प्रकरणाला राजकीय रंग चढला.
 
गोपीकिशन सांगतात, "शिवाजी महाराजांमुळेच आज हिंदू लोक या देशात टिकून आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर खूप विश्वास ठेवतो."
 
त्या दिवशी आंदोलन करणाऱ्यांमध्ये एआयएमआयएमचे मोहम्मद अब्दुल एजाज खान देखील होते.
 
एजाज खान यांच्या मते, "शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. आम्ही त्यांना नेहमीच धर्मनिरपेक्ष मानलं आहे. हिंदू संघटना त्यांना काय म्हणून मानतात याच्याशी आमचा काहीही संबंध नाही."
 
ते म्हणतात, "शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास आमचा कोणताही आक्षेप नव्हता, पण परवानगी न घेता पुतळा बसवण्यात आल्याने आम्ही आक्षेप घेतला आणि निदर्शने केली."
 
बोधन शहरातील कलदुर्की गावात सुमारे दोन वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला.
 
तेथील रहिवासी अशोक सांगतात की, पूर्वी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नव्हती, पण आता तरुण त्यांच्याबद्दल वाचत आहेत.
 
ते म्हणतात, "फक्त कलदुर्कीच नाही, तर भविष्यात प्रत्येक गावात छत्रपतींचा पुतळा बसवू. हा छत्रपतींचा पुतळा नसून हिंदूंची शक्ती आहे."
 
"प्रत्येक देशाच्या इतिहासाला एक काळी बाजू असते. पण त्या काळ्या बाजूतून आपण काय शिकतो, समाजाला कोणती दिशा देतो, यावरून एक नेता म्हणून तुमचे व्यक्तिमत्त्व दिसून येते."
 
काही महिन्यांपूर्वी जवळच्याच रानमपल्ली गावात छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता.
 
गोपीकिशन यांच्या मते, हिंदू संघटनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज श्रद्धेचा विषय आहेत आणि राजकीय नाही. पण टीकाकार हे मान्य करत नाहीत.
 
भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर म्हणून केसीआर त्यांच हिंदुत्व खरं असल्याचं म्हणतात.
 
बीबीसीशी बोलताना बीआरएस नेत्या के कविता म्हणाल्या, "मी देखील खूप धार्मिक आहे, पण माझी पूजाअर्चा जे काही असेल ते घरी."
 
त्या म्हणतात, "शिवाजी महाराजांवर आमचीही श्रद्धा आहे कारण त्यांच्यामुळे लोकांना उमेद मिळाली. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे ही भाजपची रणनीती आहे."
 
'रझाकार' चित्रपटावरून वाद
एका भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केवळ भाजपच तेलंगणाला आधुनिक रझाकारांपासून वाचवू शकतो.
 
रझाकार म्हणजे स्वयंसेवक. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, हैदराबादचे मुस्लिम शासक निजाम मीर उस्मान अली पाशा यांनी भारतात विलीन होण्याऐवजी स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला होता.
 
इतिहासकारांच्या मते, त्या काळात निजामाच्या जवळ असलेल्या कासिम रिझवीच्या नेतृत्वाखाली रझाकार नावाच्या सशस्त्र गटांनी अनेक हिंदूंवर अत्याचार केले.
 
एका आकडेवारीनुसार तेलंगणातील 13-14 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.
 
निवडणुकीपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रझाकार' चित्रपटाच्या टीझरवरून तेलंगणातील राजकारणही तापलं आहे. समीक्षक याला हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत आहेत.
 
चित्रपट निर्माता आणि भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लहानपणापासून रझाकारांबद्दलच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि चित्रपटाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
 
गुडूर नारायण रेड्डी यांच्या मते, "चित्रपटाची कथा आजच्या मुस्लिमांबद्दल नाही. तसेच इतर कोणाबद्दलही नाही."
 
चित्रपटाच्या टीझरमध्ये रझाकार हिंदू लोकांवर अत्याचार करताना दाखवण्यात आलंय. 45 कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट लवकरच पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
राज्यात निवडणुकीपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यामुळे संतापलेले सत्ताधारी बीआरएस नेते केटीआर यांनी एका ट्विटमध्ये, भाजपवर राजकीय प्रचाराच्या उद्देशाने जातीय हिंसाचार आणि ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे.
 
'रझाकार' कोण होते?
जेव्हा आम्ही हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये पोहोचलो तेव्हा चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात होते.
 
चित्रपटाच्या सेटवर रझाकार आणि गावकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांसह एक दृश्य चित्रीत केलं जात होतं.
 
अभिनेता बॉबी सिम्हाच्या मते, "चित्रपटामागे कोणतंही राजकारण नाही. यातून केवळ तेलंगणाचा इतिहास सांगायचा आहे."
 
चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक पुस्तकं वाचली असून या पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी यासाठी चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं दिग्दर्शक याटा सत्यनारायण यांनी सांगितलं.
 
डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक घंटा चक्रपाणी यांच्या मते, चित्रपट तयार करण्यामागे निवडणूक हा उद्देश आहे. त्यांच्या मते, रझाकारांमध्ये काही हिंदूही होते आणि त्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्यांमध्ये मुस्लिमही होते.
 
ते सांगतात, "सर्व रझाकार मुस्लीम नव्हते. काही हिंदूही होते. हिंदूंमध्ये काही ओबीसी, दलित, काही रेड्डी, उच्चवर्णीय लोक होते. प्रत्येकजण यात सामील होता. हे रझाकार गावांमध्ये गेले, त्यांना मोठ्या जमीनदारांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलं. हे जमीनदार कोण होते? ते स्थानिक हिंदू जमीनदार होते. या हिंदू जमीनदारांनी कम्युनिस्टांना दडपण्यासाठी रझाकारांचा वापर केला."
 
प्राध्यापक चक्रपाणी यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील कम्युनिस्टांचा लढा हा वेठबिगारीच्या विरोधात होता आणि त्यांना या व्यवस्थेतील अत्याचारित लोकांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. ज्याप्रमाणे हे प्रकरण हिंदू-मुस्लीम असं मांडलं आहे तसं ते नव्हतं.
 
त्यांच्या मते निजामाने रझाकारांना आर्थिक संरक्षण दिल्याचा कोणताही पुरावा नाही.
 
रझाकार चित्रपटाच्या वादावर भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांच्या मते, "प्रत्येक देशाच्या इतिहासाला एक काळी बाजू असते. पण त्या काळ्या बाजूतून आपण काय शिकतो, समाजाला कोणती दिशा देतो, यावरून एक नेता म्हणून तुमचे व्यक्तिमत्त्व दिसून येते."
 
त्या म्हणतात, "भाजपचा एक माणूस चित्रपट बनवतो, जो निवडणुकीच्या वेळी प्रदर्शित होतो. त्यामुळे साहजिकच त्याची विश्वासप्रणाली घट्ट करण्यासाठी त्यात लोकप्रिय भावनांचा आधार घेतला आहे. पण ती आपल्या तेलंगणाची विश्वास प्रणाली नाही."
 
50 हजार रझाकार बिगरमुस्लीम
बीडमधील इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी 'हैदराबाचा स्वातंत्र्यसंग्राम आणि बीड जिल्हा' असं पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्याकडून आम्ही रझाकारांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
हैदराबात संस्थानात उस्मान अलीच्या राज्यापूर्वी आणि त्यांच्या काळातही काही वेळ सौहार्दाचं वातावरण होतं. पण कासीम रझवी या वकिलानं रझाकारांची संघटना स्थापन करून ती निजामाच्या पाठिशी उभी केली. रझाकार केवळ मुस्लीम होते असा समज आहे. पण त्यावेळी जवळपास 50 हजार रझाकार बिगर मुस्लीम म्हणजे इतर धर्मातील किंवा जातींचे होते," असं साळुंके यांनी सांगितलं.
 
हैदराबाद संस्थानाचे राज्यकर्ते निजाम हे मुस्लीम असले तरी, मराठवाडा भागात 90 टक्के लोक मात्र हिंदू होते. त्यावेळी स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू झालेला होता. त्यामुळं कासीम रझवीनं या स्वातंत्र्यसंग्रामाला हिंदु-मुस्लीम संघर्षाचं रुप देण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं.
 
एक काळ तर असा आला होता की, निजामाकडं सैन्य कमी होतं, म्हणून त्यानं रझाकारांना जवळ केलं. त्यामुळं संस्थान निजाम चालवतो की, रझवी असा प्रश्न पडू लागला होता. रामानंद तीर्थांनी एका पत्रात निजामाला तसं विचारलंही होतं, असंही डॉ. साळुंके म्हणाले.
 
'तेलंगणा-मराठवाड्यात रझाकारांची भूमिका वेगवेगळी'
कासीम रझवीच्या या भूमिकेमुळं रझाकारांचं ध्येय फक्त गावागावात जाऊन मुस्लीमेतर लोकांवर अन्याय अत्याचार करणं हेच होतं, असं चित्र निर्माण झालं होतं.
 
काही जमीनदारांनी रझाकारांचा वापर कम्युनिस्टांच्या विरोधात केला हे खरं असलं तरी ते तेलंगणापुरतं होतं, असंही डॉ. साळुंके यांनी स्पष्ट केलं.
 
"हैदराबाद राज्यातील मराठवाड्याच्या प्रदेशात जो लढा झाला तो निव्वळ स्वातंत्र्यसंग्राम होता. पण तेलंगणात तसं चित्र नव्हतं. तेलंगणामध्ये जमीनदारांनी गरीब जनतेवर प्रचंड अन्याय केलेला होता. त्यामुळं तिथं कम्युनिस्ट निजामाबरोबरच या जमीनदारांच्याही विरोधात लढत होते. त्यामुळं या जमीनदारांनी रझाकारांची मदत घेतली होती. मराठवाड्यात मात्र तसं नव्हतं, इथं निजामाचं सैन्य आणि रझाकारांच्या विरोधात सर्वांनी लढा सुरू केला होता."
 
त्यामुळं हैदराबात राज्य असलं तरी रझाकारांची भूमिका ही तेलंगणातील प्रदेशात आणि मराठवाड्याच्या प्रदेशात वेगवेगळी होती, असंही साळुंके यांनी सांगितलं.
 
भाजप नेत्याचे निलंबन रद्द करण्याचेही संकेत
मागच्या वर्षी प्रेषित मोहम्मद यांच्या कथित वादग्रस्त विधानामुळे भाजप आमदार राजा सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
 
तेलंगणात त्यांना हिंदुत्वाचे पोस्टर बॉय म्हटले जाते.
 
तज्ञ त्यांच्या पक्षाच्या निलंबनाचा संबंध निवडणुकीतील संभाव्य लाभाशी जोडत आहेत.
 
टी राजा सिंह सांगतात की, त्यांच्यावर 80 हून अधिक पोलीस गुन्हे आणि अनेक द्वेषपूर्ण भाषणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मते या सर्व बाबी राजकीय आहेत.
 
त्यांच्या या वादग्रस्त विधानावर ते म्हणाले, "मला कोणताही पश्चाताप नाही आणि मी माझ्या आयुष्यात कधीही चुकीचं काम केलेलं नाही. हिंदू म्हणून हिंदुत्वावर बोलणं हा माझा अजेंडा आहे."
 
टी. राजा सिंह यांच्या मते, "भारतात जर कोणता देशभक्त पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. संपूर्ण भारतात हिंदूंचा विचार करणारा कोणता पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आता
 
2023 च्या निवडणुकीत आमचा केवळ एकच मुद्दा आहे, भ्रष्टाचारी केसीआरचे सरकार संपवायचे. त्यांनी तेलंगणाला कर्जात बुडवलं. इथे केसीआर मुक्त तेलंगणा आणि डबल इंजिन सरकार सत्तेवर आणायचं आहे. आणि आमचा सर्वात मोठा मुद्दा तेलंगणाचा विकास आहे."
 
भाजपच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, बंडी संजय कुमार हे राज्यात पक्षप्रमुख होते तोपर्यंत त्यांनी हिंदुत्वावर भर दिल्याने पक्षाची राज्यात झपाट्याने वाढ होत होती, परंतु त्यांना पदावरून हटवल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
 
त्यांना पदावरून का हटवण्यात आलं हे स्पष्ट झालं नसलं तरी याला पक्षातील अंतर्गत राजकारणाशी जोडलं जात आहे.
 
आम्ही प्रयत्न करूनही बंडी संजय कुमार यांच्याशी बोलू शकलो नाही.
 
त्यांच्या जागी जी किशन रेड्डी यांना राज्यात पक्षप्रमुख बनवण्यात आलं आहे.
 
भाजप आणि तेलंगणा
तेलंगणाच्या निर्मितीनंतर भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुका तेलुगु देसम पक्षासोबत युती करून लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पाच जागा मिळाल्या.
 
या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ला बहुमत मिळालं आणि के चंद्रशेखर राव राज्याचे मुख्यमंत्री झाले.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.
 
2018 मध्ये राज्य विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्यात आल्या.
 
मात्र त्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाली.
 
यावेळीही टीआरएसला बहुमत मिळालं आणि के चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्री झाले.
 
मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 17 पैकी चार जागा जिंकल्या.
 
या विजयानंतरच प्रदेश भाजपच्या छावणीत आशेचा किरण दिसू लागला आणि विधानसभा निवडणुकीत आपलाच पक्ष सरकार स्थापन करणार, असा दावा राज्यातील नेते करू लागले.
 
लोकसभा निवडणुकीतही पक्षाला 19.45 टक्के मते मिळाली होती.
 
सरकारची 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आणि डबल इंजिनची घोषणा सत्ताधारी बीआरएसच्या विरोधात जाईल, अशी आशा भाजपला आहे.
 
पण ही लढत वाटते तितकी सोपी नाही

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती