रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार
रविवार, 30 जून 2024 (13:20 IST)
रोहित शर्मानं नुकताच भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे.विजयानंतर बोलताना तो म्हणाला की, "मी या क्षणासाठी खूप आतूर होतो. या भावना शब्दांत व्यक्त करणं कठिण आहे. हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक असा क्षण आहे. जीवनात हा क्षण अनुभवण्याची मी मनापासून वाट पाहत होतो. अखेर आम्ही हे करून दाखवलं, याचा आनंद आहे."
हे यश मिळवताना त्यांनं कपिल देवच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं अगदी स्पष्ट आहे. कारण कपिलच्या नेतृत्वातही भारतानं 1983 वेस्ट इंडिजला पराभूत करून विजयी कामगिरी केली होती.
त्यानंतर अनेक वर्षांनी 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मिळवलेल्या विजयाचंही ते एकप्रकारे अनुकरण होतं. त्यावेळी तर टी20 नेमकं काय असतं? हे फारसं कुणाला माहितीही नव्हतं.
त्यानंतर 2011 वर्ल्ड कप आला. त्यावेळी भारतानं घरच्या मैदानावर वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
भारताच्या दिग्गज कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्याचा प्रवास इथवरच असल्याचंही स्पष्ट केलं.
फायनल नंतरच्या एका पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, "हा माझा अखेरचा टी20 सामनाही होता. या फॉरमॅटमधून निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. मी करिअरची सुरुवातही याच फॉरमॅटनं केली होती. माझी हीच इच्छा होती. मला हा वर्ल्डकप जिंकायचा होता."
संघाचा कर्णधार म्हणून रोहितचं जे काही कौतुक होत आहे, त्या सर्वाचा तो खऱ्या अर्थानं पात्र आहे.
पण खरं म्हणजे, रोहितला यापेक्षा खूप जास्त मिळायला हवं. खूप जास्त कौतुकास तो पात्र आहे. पण त्यासाठी त्यानं संघाला नवी दिशा दिली, त्यामुळं संघ भविष्याच्या दृष्टीनं विचार करत आहे फक्त एवढंच म्हणणं खूपच मर्यादीत ठरेल.
त्याशिवायही इतर अनेक मुद्द्यांचा विचार करता रोहितनं संघासाठी आणि देशासाठी खूप काही केलं आहे.
लीडरशिप
क्रिकेटमध्ये नीडरता किंवा धाडस ही आपल्या संघातील फलंदाजांची ओळख बनावी अशी रोहितची इच्छा होती. करिअरच्या अखेरच्या टप्प्यावर असताना रोहितनं स्वतःमध्ये तसा बदल करून दाखवला.
37 वर्षे वय असताना रोहितनं कात टाकली आणि हे धाडस कोणत्या प्रकारचं असायला हवं याचा आदर्श घालून दिला.
तुमच्या नेहमीच्या क्रिकेटिंग शॉटच्या मदतीनंच तुम्हाला तसं शक्य आहे, हेही रोहितनं दाखवून दिलं. पण त्याचवेळी कलात्मक फटक्यांमध्ये रिव्हर्स स्वीपचा समावेश करत त्यानं नवीन काहीतरी शिकून त्याचा वापरही केला.
तुम्हाला कधीतरी त्यासाठी विराटच्या मार्गावरही चालावं लागतं. ज्यानं संघाला कठिण स्थितीतून बाहेर काढण्यासाठी परत जुन्या पद्धतीनं फलंदाजीचा पट मांडला आणि यश मिळवलं.
रोहितला विजयानंतरच्या चमकेगिरिविषयी फारसं आकर्षण नाही. त्यामुळं त्यानं एक असा संघ बांधला जो ठराविक लक्ष्य मिळवण्यासाठी संघर्ष करेल. असे लक्ष्य जे कदाचित अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना माहितीही नसेल.
रोहितकडे जे खेळाडू होते त्यांच्यातील सर्वोत्तम गुणांचा त्यानं वापर करून घेतला. कदाचित रोहितला स्वतःलाही त्याचा अंदाज नसेल.
रोहितच्या संघानं प्रत्येक आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळं त्यांनी वर्ल्डकप जिंकला. मग समोर कोणताही संघ असो किंवा कोणत्याही प्रकारची स्थिती असो.
भारतानं टॉस जिंकला की हारला यानंही त्यांना काही फरक पडत नव्हता.
दमदार कामगिरी
रोहित स्वतः पुढं आला. खांद्यावर जबाबदारी स्वीकारत सर्वांना रस्ता दाखवला. भारताच्या फलंदाजीमध्ये त्यानं बॅटनंच सगळं काही बोलून दाखवलं. चांगला स्कोअर करण्यासाठी किंवा जम बसवण्यासाठी त्यानं वेळ दवडला नाही. एक तर वेगानं धावा करायच्या मग बाद झालं तरी हरकत नाही, हा मार्ग त्यानं स्वीकारला होता.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जरा स्थिती कठिण होती. पण त्यातही रोहित ठसा उमटवण्यासाठी कदाचित सर्वाधिक सज्ज होता. कारण त्याचा स्ट्राइक रेट फार चांगला नसला तरी त्यावेळी त्यानं संयमानं फलंदाजी केली. टीम लीडर म्हणून संघासाठी पाया रचण्याचं काम केलं.
स्पर्धा जसजशी पुढं जात होती तसं हे अगदी स्पष्ट झालं की, मी काय करू शकतो? हे दाखवण्यात रोहितला जराही रस नव्हता. तर या फॉरमॅटमध्ये काय काय करता येऊ शकतं, हे दाखवण्यासाठी तो तिथं होतं. काही लोक याला लीडरशिपही म्हणू शकतात.
आकडे पाहता क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटचा तो बादशाह आहे. इतरांच्या तुलनेत रोहितनं टी20 च्या 159 सामन्यांत 4231 धावा केल्या आहेत. 20 ओव्हरच्या या शॉर्ट फॉरमॅटमध्ये त्याची पाच शतकं आहेत. हाही एक विक्रमच आहे.
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी ट्वेंटीकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न त्यानं केला आहे. तो म्हणजे एक तर खेळा किंवा बाजूला व्हा, आपण त्याला 'करा किंवा मरा'असंही म्हणू शकतो.
या आक्रमक भूमिकेमुळं भविष्यातील आणि इतर सिनिअर्स खेळाडुंनाही कशाचा विचार न करता खुलेपणानं खेळत ध्येयाच्या दिशेनं पुढं जाण्यासाठी मदत मिळू शकेल.
रोहितने भारताला फक्त एक चषक मिळवून दिला असं नाही. तर फलंदाज म्हणून त्यानं एक नवा दृष्टीकोनही दिला आहे. हे कदाचित त्याचं सर्वात मोठं योगदान ठरू शकतं.
भारतीय फलंदाजांच्या पुढच्या पिढीला तो कदाचित असं आव्हान करत होता की, "जर मी 37 वर्षांच्या वयात धावा आणि चेंडू याकडं वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकतो, तर तुम्ही का नाही?"
बदलाची वेळ
आता नेतृत्वात बदलाची वेळ आली आहे. रोहितचा मुंबईतील सहकारी यशस्वी जैस्वाल आता त्याच्या खांद्यावरची जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या खांद्यावर तो वारसा पुढं नेण्यासाठी सज्ज आहे.
रोहितचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो स्वतःबाबत विचार करत नाही. रोहितनं जास्तीत जास्त वन डे खेळायला हवं होतं. तो कसोटी क्रिकेटमधील 59 सामन्यांचा आकडा आणखी वाढवेल अशी आशा आहे. पण आता वयही वाढत आहे.
भारतीय क्रिकेटकडून 'फलंदाज, कर्णधार आणि स्टेट्समन रोहित'चं कौतुक करून त्याचे आभार मानण्याची वेळ आली आहे.
रोहितनं भारतीय क्रिकेटला हा विश्वचषक जिंकून दिला नसता तरीही सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीतलं त्याचं स्थान बदललं नसतं.
इतर अनेक फलंदाज आणि गोलंदाज असतील, पण आपलं काम आणि शब्द यांच्याही पुढं जाऊन संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार मिळणं कठिण आहे.