यूएस ओपनचा बाहदशाह नदाल

मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:10 IST)
टेनिस कोर्टवर  पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित रफाएल नदालची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्यानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अमेरिकन खुली तिसरी आणि कारकीर्दीतील १६वी ग्रँडस्लॅम ट्रॉफी  नदालने जिंकली.
 
दुखापतीला जिद्दीनं परतावून लावत नदालने यावर्षी कोर्टवर दमदार पुनरागमन केलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपविजेता होता, तर फ्रेंच ओपनमध्ये  त्यानं बाजी मारली होती. त्यानंतर अमेरिकेत त्यानं वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं आहे.
 
कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ३२व्या मानांकित केविन अँडरसनपुढे नदालच सरस  ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत नदालचे पूर्ण वर्चस्व होते. त्याने पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्याला  दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालच सरस दिसून आला. तर पीटर अँडरसनने नदालच्या अनुभवासमोर पूर्णपणे गुडघे टेकल्याचे दिसत होते. हा सेटही नदालने 6-3 ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
 
पहिल्या दोन सेट नंतर तिसऱ्या सेटमध्येही नदाल विजेत्याप्रमाणे खेळला. पीटर अँडरसनच्या चुकांचा त्याने अचूक फायदा उचलला. पण शेवटच्या दोन-तीन गेममध्ये अँडरसनने नदालला कडवी टक्कर दिली. शेवटी  हा सेटही 6-4 ने जिंकत नदालने अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती