अमेरिकन ओपनचे स्लोआनी स्टीफन्सला जेतेपद

सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (12:48 IST)
बिगरमानांकित 24 वर्षीय स्लोन स्टीफन्सने अमेरिकन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या किताबावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत स्टीफन्सने आपल्या देशाच्या मॅडिसन कीजवर सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय मिळवित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी ती दुसरी बिगरमानांकित खेळाडू ठरली.
 
रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत जेमतेम तीन महिन्यांपूर्वी अत्यंत गंभीर दुखापतींमधून सावरलेल्या स्लोन स्टीफन्स स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी कायम राखत मॅडिसन कीजचा अक्षरशः धुवा उडविला. स्टीफन्सने अंतिम सामना तासाभरात 6-3, 6-0 असा जिंकला. तिचे कारकिर्दीतील हे पहिलेच ग्रॅडस्लॅम पदक आहे.
 
15 व्या मानांकित मेडिसन किजने अंतिम सामन्यात अगदीच निराशाजनक खेळ केला. पहिल्यांदाच ग्रॅंडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळत असल्याचे दडपण तिच्यावर स्पष्ट दिसत होते. पहिल्या सेटमध्ये पाचव्या आणि नवव्या गेमला सर्व्हिस गमावली. तर दुसऱ्या सेटमध्ये तिला एकदाही आपली सर्व्हिस राखता आली नाही. या सेटच्या पाचव्या गेममध्ये तिला तीन ब्रेकपॉईंट मिळाले होते. परंतु त्याचाही तिला फायदा घेता आला नाही.
 
तत्पूर्वी, स्टिफन्सने पहिल्या उपान्त्य लढतीत माजी विजेत्या आणि नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सचे आव्हान 6-1, 0-6, 7-5 असे मोडून काढत अंतिम फेरी गाठली. त्याआधी तिने माजी विम्बल्डन विजेत्या मारिया शारापोव्हावर सनसनाटी मात करणाऱ्या लात्वियाच्या सोळाव्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान मोडून काढताना पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली होती.मॅडिसनने दुसऱ्या उपान्त्य लढतीत अमेरिकेच्या 10व्या मानांकित कोको वान्डेवेघेचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविताना अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी वान्डेवेघेने अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभूत करताना सनसनाटी निकालाची नोंद केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती