भारतीय कुस्ती महासंघाला आज नवे अध्यक्ष मिळाले आहेत. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. संजय सिंह यांना अध्यक्ष केल्यानंतर आता पुन्हा एकदा कुस्ती शौकिनांमध्ये नाराजी आहे. संजय सिंग अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषद देताना साक्षी मलिक खूपच भावूक झाली. साक्षी मलिक म्हणाली की, ब्रिजभूषण सिंह शरणच्या विरोधात मी सुमारे 40 दिवस आंदोलन केले होते, पण आता जर त्यांच्या जवळच्या व्यक्तीला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनवले गेले तर मी कुस्ती सोडणार आहे.
पत्रकार परिषदेत साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती मात्र आमची मागणी पूर्ण झाली नाही. भारतीय महिला कुस्ती महासंघाच्या अध्यक्षा महिला असल्यास कोणाचाही छळ होणार नाही. आजपर्यंत एकाही महिलेला कुस्ती महासंघात स्थान मिळालेले नाही. आमचा हा लढा सुरूच राहणार असून याआधीही आम्ही पूर्ण ताकदीने लढलो होतो आणि भविष्यातही लढत राहू. त्यासाठी युवा पैलवानांनाही पुढे यावे लागेल. पत्रकार परिषदेत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर साक्षी मलिक रडत रडत बाहेर आली.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी यापूर्वीच निदर्शने केली आहेत. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता.