जागतिक चॅम्पियन फुटबॉल संघ अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात कोराकाओचा 7-0 असा धुव्वा उडवला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने या सामन्यात तीन गोल केले. यादरम्यान त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही 100 गोल पूर्ण झाले. विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी मैत्रीपूर्ण सामन्यात पनामाचा 2-0 असा पराभव केला होता.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल पूर्ण करणारा मेस्सी हा तिसरा फुटबॉलपटू आहे. त्याने 174 सामन्यात 102 गोल केले आहेत. यादरम्यान मेस्सीने 54 गोल करण्यात मदत केली. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने 198 सामन्यात 122 गोल केले आहेत. त्याच्यानंतर इराणचा अली दाई दुसऱ्या स्थानावर आहे. अलीने 148 सामन्यांत 109 गोल केले.
मेस्सीने 100 गोल पूर्ण करताच एक विशेष कामगिरी केली. विश्वचषक जिंकणारा तसेच 100 गोल पूर्ण करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू आहे. रोनाल्डो आणि अली दाई यांनी 100 हून अधिक गोल केले आहेत,परंतु दोघांनाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.