भारताच्या हॉकी कर्णधारासह चौघांना कोरोनाची लागण
भारताचा हॉकी कर्णघार मनप्रीत सिंग याच्यासह राष्ट्रीय शिबिरासाठी दाखल झालेले एकंदर चार हॉकीपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. मनप्रीतसह बचावपटू सुरेंदर कुमार, जसकरण सिंग, ड्रॅगफ्लिकर वरुण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मी स्वविलगीकरणात आहे. माझी प्रकृती ठीक आहे. लवकरच मी पूर्ण तंदुरुस्त होईन, असे मनप्रीतने सांगितल्याचे क्रीडा प्राधिकरणाच्या पत्रकात म्हटले आहे.
भारतीय हॉकी संघातील हॉकीपटूंना एका महिन्याचा ब्रेक देण्यात आला होता. बंगळूरला शिबिरासाठी दाखल झाल्यावर त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे ठरले होते. त्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात चौघांना बाधा झाली आहे. खरे तर रॅपिड कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले होते, पण मनप्रीत आणि सुरेंदर यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यामुळे त्यांच्यासह दहा जणांची आरटी-पीसीआर चाचणी झाली. त्यानंतर या चौघांना बाधा झाली असल्याचे लक्षात आले.