हॉकी एकतर्फी विजयासह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद उपांत्य फेरीत
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)
गतविजेत्या हॉकी पुणे संघाने स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अन्य उपांत्यपूर्व फेरीतून उस्मानाबाद, औरंगाबाद आणि कोल्हापूर संघांनी देखील उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या हॉकी पुणे संघाने वेंकटेश केंची याने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर जळगावचा १३-० असा धुव्वा उडवला. वेंकटेशने तिसऱ्या, सहाव्या, सातव्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
रईस मुजावर याने पहिल्याच मिनिटाला गोल करून पुण्याचा गोल धडाका सुरू केला. त्यानंतर पुण्यासाठी रोहन पाटील, हरिष शिंदगी, प्रज्वल मोहरकर, प्रणव माने, अथर्व कांबळे (दोन गोल), कर्णधार गुफरान शेख, तालेब शहा यांनी गोल करून पुणे संघाच्या विजयात आपला वाटा उचलला.
उस्मानाबाद, औरंगाबाद यांनी आपापले सामने सहज जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, उस्मानाबादने नांदेड, तर औरंगाबादने रायगडचा पराभव केला.
उस्मानाबाद संघाने गतवर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या नांदेडचा ३-१ असा पराभव केला. संतोष कस्तुरे, फिरोज वस्ताद आणि झिशान शेख यांनी अनुक्रमे १५, १८ आणि ३५व्या मिनिटाला गोल केले. साईनाथ पेनपल्ले याने ५७व्या मिनिटाला नांदेडसाठी एकमात्र गोल केला.
औरंगाबादने रायगडवर ४-० अशी मात केली. मोहित काथोटे याने हॅट्रिक नोंदवताना ७व्या, १३व्या आणि ३४व्या मिनिटाला गोल केला. त्यांच्यासाठी चौथा गोल अक्षय जाधव याने २४व्या मिनिटाला केला.
चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत कोल्हापूरने नंदुरबारचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणले. मयुर पाटीलने ३४ आणि ५६व्या मिनिटाला दोन गोल केले. मजहर शेखने दुसऱ्या मिनिटाला कोल्हापूरचे खाते उघडले होते. माज सय्यदने २४व्या आणि दिपक मलई याने ३३व्या मिनिटाला गोल करून कोल्हापूरचा विजय भक्कम केला.