एअर पिस्तुल प्रकारात हिना सिद्धुला सुवर्ण

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (11:43 IST)
भारताची अव्वल महिला नेमबाज हीना सिधूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताला सोनेरी सलामी दिली. त्याचप्रमाणे दीपक कुमारने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकताना भारताला पहिल्या दिवशीचे दुसरे पदक मिळवून दिले.
 
हीना सिधूने गेल्याच आठवड्यात नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम सत्रातील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकाराच्या मिश्र दुहेरी गटात जितू रायच्या साथीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. हीनाने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना आज महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील पहिल्या फेरीत 386 गुणांची कमाई केली आणि अंतिम फेरीत 240.8 गुणांची नोंद करताना एकूण 626.8 गुणांच्या कमाईसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 
दीपक कुमारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमीा केली. भारताचा लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंगने त्याच प्रकारातील प्राथमिक फेरीत 626.2 गुणांचा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला होता. परंतु अंतिम फेरीतील निरासाजनक कामगिरीमुळे त्याला अखेर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर भारताचा रविकुमार पाचव्या क्रमांकावर राहिला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती