भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजयी पदार्पण केले. प्रणॉयने पुरुष एकेरीच्या लढतीत चायनीज तैपेईच्या जिजू वेई वांगचा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने हा सामना 49 मिनिटांत 21-19, 22-20 असा जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
केरळचा 30 वर्षीय प्रणॉय दुसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका आणि कांताफोन वांगचारोन यांच्यातील विजेत्याशी खेळेल. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने 11-4 अशी आरामदायी आघाडी उघडली पण नंतर चूक केली आणि वांगने 14-11 अशी आघाडी कमी केली. दरम्यान, प्रणॉयने चांगले पुनरागमन करत 18-12 अशी आघाडी घेतली. त्यानंतर स्कोअर 19-19 असा झाला, पण शेवटी प्रणॉयने 21-19 असा गेम जिंकला.