मुंबई : राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
मंत्री श्री. महाजन यांचे शासकीय निवासस्थान सेवासदन येथे जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी श्री.यामाशिता, उपसंचालक, इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हीजन, वाकायामा स्टेट, जपान हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.
राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे विविध उपक्रम, मिळविण्यात आलेल्या पदकांविषयी मंत्री श्री. महाजन यांनी माहिती दिली. तसेच कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान – प्रदान करण्याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे सांगितले. सामंजस्य करार लवकर होण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री श्री. महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.