सिंधू, साक्षी, दीपा, जितूला ‘खेलरत्न’

मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (08:57 IST)
ललिता बाबर, राहाणे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणार 

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवणारी ‘रुपेरी’कन्या पी.व्ही. सिंधू, देशाच पदकांचे खाते उघडणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समधील सगळ्यात कठीण ‘प्रोडुनोव्हा’ प्रकार करून जगाचे मन जिंकणारी दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय या चौघांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ‘खेलरत्न’चार क्रीडापटूंना एकत्र दिला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘खेलरत्न’सोबतच ‘महागुरूं’ना दिल्या जाणार्‍या द्रोणाचार्य पुरस्काराची आणि नव्या दमाच्या भिडूंची जिद्द वाढवण्यासाठी दिल्या जाणार्‍या अजरुन पुरस्काराचीही घोषणा आज केंद्र सरकारने केली आहे. महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर आणि मुंबईकर क्रिकेटवीर, कसोटी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य राहाणे याला अजरुन पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी, पण पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पदकावर नाव कोरू न शकलेली कुस्तीपटू विनीश फगट हिलाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
जिमनॅस्ट दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला लहानपणापासून क्रिकेटचे धडे देणारे राजकुमार शर्मा हेही द्रोणाचार्य सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. 
 
 

वेबदुनिया वर वाचा