नदाल बार्सिलोनात विजेता

वेबदुनिया

मंगळवार, 1 मे 2012 (14:42 IST)
WD
स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने क्‍ले कोर्टवरील हुकूमत कायम राखली आहे. त्याने बार्सिलोना ओपनमध्ये सातव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात नदालने देशबांधव डेव्हिड फेरर याच्यावर दोन सेटमध्ये मात केली.

नदालने येथे सलग 34 सामने जिंकले आहेत. गेल्या आठवड्यात नदालने मॉंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेत आठव्यांदा विजेतेपद संपादन केले होते. नदालने यापूर्वी येथे 2005 ते 2009 अशी सलग पाच वर्षे आणि गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. येथे नदालने फेररला अंतिम सामन्यात चौथ्यांदा हरविले.

याविषयी नदाल म्हणाला, ""बार्सिलोनामध्ये सात वेळा जिंकण्याची कामगिरी कल्पनेपलीकडची आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी "स्पेशल' आहे. "होम कोर्ट'वर तुम्ही ज्यांना ओळखता अशा चाहत्यांच्या उपस्थितीत जिंकणे आणखी "स्पेशल' असते. मॉंटे कार्लोमध्ये मी उच्च दर्जाचा खेळ केला. आता येथे सुद्धा मी एकही सेट गमावला नाही. ऑस्ट्रेलियात मोसमाची सुरवात केल्यापासून मी उच्च दर्जाचा खेळ करतो आहे.''

नदाल जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे हे कारकिर्दीतील 48वे विजेतेपद आहे. दोन एटीपी स्पर्धा सात किंवा जास्त वेळा जिंकलेला तो पहिलाच टेनिसपटू ठरला.

वेबदुनिया वर वाचा