नदाल, फेडरर, अजारेंका उपांत्यपूर्व फेरीत

वेबदुनिया

सोमवार, 23 जानेवारी 2012 (16:03 IST)
जागतिक टेनिस क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला राफेल नदाल, तिसरा मानांकित रॉजर फेडरर आणि महिलांमध्ये तिसरी मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांवर मात करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आशियातील पहिली ग्रँडस्लॅम विजेती ली ना हिला मात्र संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ली ना हिचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी फेलिसियानो लोपेजचा ६-४, ६-४, ६-२ ने पराभव करीत अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. १६ ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा मानकरी फेडरर ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय युवा बर्नाड टॉमिकचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी ठरला. फेडररने टॉमिकचा ६-४, ६-२, ६-२ ने पराभव केला.

नदाल व फेडररने उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश मिळवला असताना सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचला स्पेनच्या निकोलस अल्माग्रोविरुद्ध ४-६, ७-६, ७-६, ७-६ ने विजय मिळवीत घाम गाळावा लागला. पहिला सेट गमावणार्‍या बर्डिचने त्यानंतर सलग तीन सेट टायब्रेकमध्ये जिंकत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. फेडररने बिगरमानांकित टॉकिकविरुद्ध १ तास ४४ मिनिटे खेळल्या गेलेल्या लढतीत वर्चस्व गाजवले.

वेबदुनिया वर वाचा