फिफा विश्‍वचषक स्पर्धा २0१८चे बोधचिन्ह प्रसिद्ध

गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:52 IST)
२0१८ साली रशियात होणार्‍या फिफा विश्‍वचषकाचे बोधचिन्ह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे. रशियाची राजधानी मॉस्को येथे असलेल्या सुप्रसिद्ध बोलोशोई थिएटरच्या इमारतीवर हे बोधचिन्ह प्रतिबिंबीत करण्यात आले. हा सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण रशियाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील एका टॉक शोमध्ये दाखवण्यात आले. या वेळी फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर, इटलीचे महान फुटबॉलपटू फॅबिओ कॅनाव्हारो आणि रशियाचे क्रीडा मंत्री व्हिताली मुत्को हे उपस्थित होते. 
 
रशियाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील टॉक शोदरम्यान मंगळवारी हे बोधचिन्ह प्रसिद्ध करताना ब्लेटर म्हणाले, या बोधचिन्हातून रशियाचे हृदय आणि चैतन्य अधोरेखित होते. या बोधचिन्हात विश्‍वचषक करंडक लाल आणि निळय़ा रंगामध्ये रेखाटण्यात आला आहे. 
 
त्याला सोनेरी रंगाची किनार आहे. रशियाच्या झेंड्यातील लाल आणि निळा रंग यामध्ये वापरण्यात आला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्लॅटर यांनी मंगळवारी मॉस्को येथील 'लुझिन्की' स्टेडियमला भेट दिली. सध्या या मैदानाच्या विस्ताराचे आणि पुनर्बांधणीचे काम सुरू असून, या ठिकाणी विश्‍वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. मंगळवारी रशिया २0१८ आयोजक समितीच्या निरीक्षण मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी विश्‍वचषकाच्या तयारीचे टप्पे पाहण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात येईल, असे पुतीन यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा