किम क्लिस्टर्सचा अमेरिकन ओपन नंतर संन्यास

वेबदुनिया

गुरूवार, 24 मे 2012 (11:36 IST)
WD
काही काळ जागतिक पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवणार्‍या बेल्जियमच्या किम क्लिस्टर्स हिने टेनिसमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या वर्षातील अंतिम ग्रॅण्ड स्लॅम अमेरिकन ओपन स्पर्धेनंतर आपण टेनिस कोर्टला रामराम ठोकणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.

28 वर्षीय किम क्लिस्टर्सने यापूर्वीही टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण 2009 मध्ये तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर तिने तीन ग्रॅण्ड स्लॅम मिळवून आपल्या प्रमुख व महत्त्वाच्या अजिक्यपदांची संख्या चारवर नेवून ठेवली होती.

किमला टेनिस कारकिर्दीत नेहमीच दुखापतींनी बेजार केले. रविवारपासून सुरू होणार्‍या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही तिने याच कारणावरून माघार घेतली आहे. 27 ऑगस्टपासून 9 सप्टेंबर या कालावधीत होणारी अमेरिकन ओपन स्पर्धा आपल्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. अमेरिकन ओपन स्पर्धेतच आपण सर्वाधिक यश मिळवले आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, असे तिने यावेळी सांगितले. आपले प्रायोजक गॅलेक्सोच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना तिने ही घोषणा केली.

वेबदुनिया वर वाचा