ऑलिम्पिकच्या तिकीटावरुन ‘कुस्ती’

शनिवार, 14 मे 2016 (12:08 IST)
रिओ ऑलिम्पिकच्या तिकीटासाठी पैलवान नरसिंह यादव आणि पैलवान सुशीलकुमार यांच्यात कुस्तीचा फड चांगलाच रंगला आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याचे संकेत सुशीलकुमारने दिल्याने ही कुस्ती आता न्यायालयात निकाली निघणार असल्याचे दिसून येत आहे. 
 
सुशील कुमारने 2008 आणि 2012 सालच्या लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि रौप्य अशी दोन पदकांची कमाई केली होती. त्यानंतर 2014 सालच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तो सुवर्णपदक विजेता ठरला होता. पण त्यानंतर गेली दोन वर्षे तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. दरम्यान, ७४ किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणारा नरसिंह यादव रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लास वेगासमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करुन त्याने रिओ ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. आता रिओ ऑलिम्पिक तीन महिन्यांवर आलेलं असताना सुशील कुमारने त्याची आणि नरसिंह यादवची चाचणी कुस्ती खेळवण्याची मागणी केली आहे. मात्र, कोटा मिळविणार्‍या नरसिंहने ती फेटाळून लावली आहे. 

वेबदुनिया वर वाचा